पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (दि.१०) घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेला (टीईटी) राज्यातील ९३ टक्के उमेदवारांची उपस्थिती होती. परीक्षा सुरळीत पार पडली असली, तरी कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्या परीक्षा केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती परिषदेने दिली आहे.
टीईटीसाठी ३ लाख ५३ हजार ९५२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील ३ लाख २९ हजार ३४६ म्हणजेच ९३.०५ टक्के उमेदवारांनी परीक्षेला उपस्थिती लावली. टीईटी परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी यंदा प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) तंत्रज्ञानाद्वारे प्रत्येक परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवण्यात आले.
उमेदवाराचे फेस रीडिंग, बायोमेट्रिक, मेटल डिटेक्टरचाही वापर करण्यात आला. प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरा बसविल्याने परीक्षेत सर्व बाबींवर लक्ष ठेवले होते. काही केंद्रांवर काही विचित्र प्रकार आढळून येताच परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित केंद्रसंचालकांना कामकाजात सुधारणा करण्याचे आदेशही बजाविले.
अहवाल मागविला
टीईटी परीक्षेदरम्यान काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामात कुचराई केल्याचेही निदर्शनास आले असून, नांदेड, औरंगाबाद, बीड जिल्ह्यांसह अन्य काही ठिकाणी उमेदवार मागेपुढे पाहत होते. काही उमेदवार पेपर सुरू असताना एकमेकांशी बोलतांना आढळले आहेत. याबाबत संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला असून, दोषी आढळणारे केंद्रसंचालक, समावेक्षक व अन्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे यांनी दिली.