पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात सायबर गुन्हे शाखेने नाशिक, बुलढाणा येथून दोन दलालांना अटक केली.
दीपक विक्रम भुसारी (32, रा. अयोध्यानगर, बुलढाणा), राजेंद्र विनायक सोळुंके (52, रा. नांदगाव, जि. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या दलालांची नावे आहेत. टीईटी गैरव्यवहार प्रकरणात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.
गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. दलालांनी अपात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचे उघडकीस आले आहे. राज्यातील सात हजार अपात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तपासात मिळालेल्या माहितीनुसार दलाल भुसारी आणि सोळुंके यांना अटक करण्यात आली.
आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहायक आयुक्त विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, सहायक निरीक्षक भालेराव, कदीर देशमुख, उपनिरीक्षक वाघमारे, सागर पडवळ, प्रवीण राजपूत, सौरभ घाटे, आदेश चलवादी आदींनी ही कारवाई केली.