साताऱ्यात 19 जानेवारीला टीईटीची परीक्षा

सातारा – पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेल्या शिक्षकांच्या पात्रता परीक्षेला अखेर मुहुर्त मिळाला आहे. ही परीक्षा 19 जानेवारी रोजी होत असून सकाळी साडेदहा ते एक व दुपारी दोन ते साडेचार या दोन टप्प्यात परीक्षा होणार आहे. यापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी भरतीकरिता गेल्या फेब्रुवारीत पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले.

राज्यातील हजारो बीएड, डीएड शिक्षकांनी या पोर्टलवर नोंदणी केली होती. मात्र पोर्टलवर अपडेट होणाऱ्या माहितीमध्ये तांत्रिक त्रुटी आल्याने अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाले. पाच महिन्यापूर्वी झालेल्या शिक्षक भरतीत बिंदू नामावलीनुसार भरती संख्या निश्‍चित करण्यात आली होती. मात्र खाजगी संस्थाचालकांकडून गुणवत्ता यादी डावलून परस्पर नेमणूका झाल्याने त्यानंतर भरती प्रक्रियेसाठी पन्नास टक्के गुणांची अट असे दोन वेळा ही भरती न्यायप्रविष्ट बाब झाली. त्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया लांबत जाऊन पन्हा 1 नोव्हेंबर ते 20 जानेवारी 2020 या दरम्यान ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 28 नोव्हेंबर असून 4 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढावयाची आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचा पहिला पेपर सकाळी साडेदहा ते एक व दुसरा पेपर दुपारी दोन सायंकाळी साडेचार पर्यंत आहे. पन्नास टक्के गुणांकनाची अट काढून टाकण्यात आल्याने शिक्षक भरतीचे घोडे पुढे सरकले आहे. शिक्षक वर्तुळात या परीक्षा भरतीसाठी जोरदार तयारी शिक्षकांची सुरु आहे. शासनाकडून पुन्हा प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची पात्रता परीक्षा घेण्याचे नियोजन निश्‍चित झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.