आरोग्य विभागाचा पुन्हा सावळा गोंधळ; “टीईटी” व आरोग्य विभागाची परीक्षा एकाच दिवशी

पुणे – राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याच्या भरती परीक्षेसाठीच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आता, आरोग्य विभाग व शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 31 ऑक्‍टोबर या एकाच दिवशी येत आहेत. यामुळे आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा उघड झाला आहे. दरम्यान “टीईटी’ परीक्षेची तारीख आधीच ठरली असल्याने त्यात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाची गट “क’ व “ड’ संवर्गासाठी 25 व 26 सप्टेंबरला परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र परीक्षेची तयारी पूर्ण झालेली नसल्याने ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली. आता आरोग्य विभागाच्या गट “क’ संवर्गाची परीक्षा 24 ऑक्‍टोबरला तर गट “ड’ची परीक्षा 31 ऑक्‍टोबरला घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.

आधीच शिक्षण विभागाकडून “टीईटी’ परीक्षेची तारीख निश्‍चित केलेली असताना त्याच दिवशी आरोग्य विभागानेही कशी काय परीक्षा ठेवली, असा प्रश्‍न उमेदवारांकडून उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. “टीईटी’ परीक्षा वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात येणार नाही, अशी माहिती आयुक्‍त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.