34,010 प्रती दहा लाख व्यक्तींमागे चाचण्या
पुणे – शहरातील करोनाबाधितांच्या चाचण्यांनी आतापर्यंत दीड लाखाचा टप्पा ओलांडला आहे. 9 जुलैअखेर शहरात तब्बल 1 लाख 50 हजार 628 चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर मागील 15 दिवसांत तब्बल 50 हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. हे प्रमाण प्रती दहा लाख व्यक्तींमागे तब्बल 34 हजार 10 जणांची तपासणी केली जात आहे.
शहरात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात संशयितांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यात, प्रामुख्याने बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या रुग्णांच्या चाचण्या करून त्यांना तातडीने विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. शहरात 9 मार्च रोजी पहिला करोनाबाधित आढळल्यानंतर महापालिकेने मोठ्या प्रमाणात चाचण्यांचा आकडा वाढवला आहे.
मार्च अखेरपर्यंत दिवसाला सुमारे 200 ते 300 चाचण्या केल्या जात होत्या, त्यानंतर हा आकडा मेच्या मध्यापर्यंत सुमारे 800 ते 900 होता. जूनच्या सुरुवातीला तो 1,500 ते 2,000 पर्यंत गेला असून जुलैमध्ये तो साडेचार हजारांच्या घरात गेला आहे. त्यामुळे रुग्ण वाढत असतानाच प्रशासन चाचण्याही वाढवत आहे.
त्यामुळे शहरातील एकूण चाचण्यांचा आकडा दीड लाखावर गेला आहे. 25 जून रोजी शहरातील एकूण चाचण्यांचा आकडा 1 लाख होता. तर मागील 15 दिवसांत तो तब्बल 50 हजारांनी वाढला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.