स्थानिक भाजपाकडून पालिकेसाठी चाचपणी

काहीजणांना कामाला लागण्याच्या सूचना

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला अद्याप दीड वर्षाचा कालावधी शिल्लक असला तरी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आतापासूनच चाचपणी सुरू केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीतील निष्ठेचे फळ काहीजणांना मिळण्याची शक्‍यता असून “त्यांना’ कामाला लागण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. एकंदरीतच या प्रकारामुळे भाजपाच्या काही नगरसेवक आणि इच्छुकांमध्ये अस्वस्थता आणि उत्साहही पहावयास मिळत आहे.

महापालिकेत सध्या भाजपाची सत्ता आहे. स्थानिक पातळीवरील सत्तेचे “महत्त्व’ गेल्या साडेतीन वर्षांत भाजपाच्या स्थानिक नेत्यांना चांगलेच लक्षात आले आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ता कोणत्याही परिस्थितीत ताब्यात राहिली पाहिजे, यासाठी भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाकडून आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे अजित पवार पुन्हा सक्रिय झाल्याने तसेच आता मोदी लाटेचा अपेक्षित फायदा होणार नसल्यामुळे सत्ता टिकविणे तितके सोपे राहिले नाही. मात्र राष्ट्रवादीतील मरगळ भाजपाला पुन्हा सत्ता देऊ शकते हा विश्‍वास असल्याने भाजपाने आतापासून तयारीला सुरुवात केली आहे.

चिंचवडसह पिंपरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांसाठी शहर पातळीवरील एका नेतृत्वाने आतापासून तयारी चालविली आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत तसेच ज्या नगरसेवकांनी विधानसभेत अपेक्षित “रसद’ पुरविली नाही अथवा विरोधी भूमिका घेतली त्यांचा बंदोबस्त करण्याची तयारीही सुरू झाली आहे. चिंचवडमधील काही इच्छुकांसह एका स्वीकृत नगरसेवकाला थेट कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच वॉर्डाची अपेक्षित रचना लक्षात घेऊन काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वॉर्डाबाहेर फिरण्यापेक्षा वॉर्डातच काम करा, असा संदेशही देण्यात आला आहे. असाच प्रकार पिंपरीतील काही वॉर्डामध्येही घडला आहे.चिंचवड विधानसभेतील भाजपाचे घटलेले मताधिक्‍य, विरोधकांची वाढलेली ताकद, भाजपाच्याच नगरसेवकांचा अंतर्गत विरोध या बाबींचा विचार करून आतापासूनच महापालिकेसाठी रणनीती तयार केली जात असून, अपेक्षित नगरसेवकांना सोबत घेऊन पुन्हा महापालिकेची सत्ता काबिज करण्याची तयारी सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आनंद अन्‌ अस्वस्थता…
सर्व प्रकार अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू असला तरी याची खबर सर्वांनाच मिळू लागली आहे. त्यामुळे ज्यांना कामाला लागण्याच्या सूचना मिळत आहेत त्यांच्यात आनंदाचे वातावरण असले तरी इतर प्रबळ दावेदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातच काही नगरसेवकांचेही तिकीट “कट’ होणार हे यातून समोर आल्यामुळे त्यांच्यामध्येही अस्वस्थता निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.