कसोटीला नवसंजीवनी मिळावी

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या भरात आहे, असे म्हटले जाते. “वासरात लंगडी गाय शहाणी’ असे तर चित्र नाही ना अशी शंका येते. कोहलीच्या संघाने 2018 पासून जितके कसोटी सामने खेळले त्यात डावाने विजय मिळाल्याची संख्या जास्त आहे. भारताने यंदा अनेक सामने डावाने जिंकले पण त्याही पेक्षा जास्त चर्चा झाली ती पाच दिवसांचे सामने आपण तिसऱ्याच दिवशी जिंकले याची. कमकुवत संघांना धोबीपछाड टाकून तीन दिवसांत जिंकलेले सामने होते की तीन दिवसांचा तमाशा असा प्रश्‍न पडू लागला आहे.

संघातील खेळाडूंना पूर्ण पाच दिवसांचे पैसे मिळतात, पण प्रतिस्पर्धी संघ पूर्ण खेळू शकत नाही व सात तासांचा खेळ दर दिवशी धरला तर केवळ 21 तासांतच समोरच्या संघाचा पराभव होत आहे. खेळाडूंचे कोणतेही नुकसान होत नाही मात्र मुख्य तसेच सहप्रायोजकांचे अतोनात नुकसान होते. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला देखील खूप आर्थिक फटका बसतो. इतकेच नाही तर ज्यांनी पूर्ण पाच दिवसांचे तिकीट काढलेले असते त्यांना चौथ्या व पाचव्या दिवसाच्या तिकिटांचे पैसे देखील परत करावे लागतात. म्हणजे मंडळाचे व प्रायोजकांचे दुहेरी नुकसान होते. हे म्हणजे “बाप जेऊ घालत नाही आणि आई भीक मागू देत नाही’ असेच चित्र उभे राहते. यंदाच्या मोसमात भारताने फलंदाजांच्या खेळीने मोठ्या धावसंख्या उभारुन प्रतिस्पर्धी संघांवर दबाब ठेवला. महंमद शमी आणि कंपनीने समोरच्या संघाच्या फलंदाजीची वाताहत केली ती देखील सातत्याने, त्यामुळे भारताने अनेक सामने तंटामुक्तीप्रमाणे तिन दिवसांतच निकाली काढले. पण खरे सांगायचे तर भारताच्या यशाचा आनंद होतोच पण टी-20 क्रिकेटनी कसोटी क्रिकेटपटू निर्माण होण्याची खाणच बंद केली हे देखील कुठेतरी खटकते.

राहुल द्रविडसारखा फलंदाज आजही आपण शोधत आहोत. पुजाराला त्याचा नवा अवतार आपण समजत होतो पण डुप्लिकेटला ओरिजिनलची सर येत नाही. आज भारतीय फलंदाजी पुर्वीप्रमाणे कोणा एकट्यावर अवलंबून नाही याचा आनंद आहे. सलामीलाच रोहित आणि मयांक हे पुजारा व कोहलीसाठी व्यासपीठ तयार करून ठेवतात व नांदीनंतरचे प्रवेश सोपे होतात. एका कसोटी सामन्यात थोडे बरे वाटत नसल्याने लिटील मास्टर सुनील गावसकर सलामीला फलंदाजीसाठी येण्याएवजी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार होते. मात्र वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्या सामन्यात पहिल्याच षटकात भारताचे दोन फलंदाज शून्यावर बाद झाले व गावसकर यांना फलंदाजीसाठी यावे लागले. तेव्हा स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेले सर वीव्हियन रिचर्डस गावसकरांना म्हणाले होते की, सनी तू कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी आलास तरी भारताची धावसंख्या शून्यच असते. भारतीय संघाकडे भक्कम फलंदाजी तर पुर्वीपासूनच होती, पण आता अत्यंत बलाढ्य वेगवान गोलंदाजीही आहे, म्हणूनच पाच दिवसांचे सामने तीन दिवसांत निकाली निघत आहेत. हेच सातत्य ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व न्यूझिलंड यांच्याविरुद्ध दाखविले तरच ही गुणवत्ता कसोटीला उतरेल.

यंदा तर आपल्या फलंदाजांनी विशेषता नवोदित मयांक आग्रवालने अफलातून खेळी केल्या. रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्‍वर पुजारा यांच्या बरोबरीने भक्कम फलंदाज आपण शोधत होतो. मयांकने या शोधाचे सप्रमाण उत्तर दिले. एकीकडे वारंवार संधी देऊनही रुषभ पंत अपयशी ठरत आहे तर मयांकसह यष्टीरक्षक वृद्धिमान साहा यशस्वी ठरत आहेत. अर्थात पंतकडे कसोटसाठी यष्टीरक्षक म्हणून कधीच पाहिले गेले नाही, पण महेंद्रसिंग धोनीचा वारसदार आपण शोधत आहोत, आणि धोनीचा पर्याय मात्र अद्यापही मिळालेला नाही. रोहितला सलामीवीराची जबाबदारी सोपवल्यानंतर त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले तसेच मयांकनेही रोहितला तुल्यबळ साथ देत संघाला भक्कम सलामी दिली. हेच सातत्य त्याने यापुढेही राखले तर कोहलीवरचा ताण कमी होईल.

आपण यंदाच्या मोसमात जे कसोटी सामने खेळलो त्यातील जवळपास 90 टक्के सामने आपण डावाने जिंकलो. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका व बांगलादेश या मालिका आपण जिंकलो. त्यातही आपण डावाने विजय मिळविले. विराट कोहली डावाने सामने जिंकणारा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. क्रिकेटच्या तीनही क्षेत्रात वर्चस्व राखण्यात भारतीय संघाला यशही मिळाले. प्रश्न एकच आहे की आपण खेळलो कोणा बरोबर. आजच्या क्षणी हे तिनही संघ बांधणीच्या प्रक्रियेतून जात आहेत. त्यांच्या संघातील नामांकीत खेळाडू एकतर निवृत्त झालेत किंवा या मालिकांमध्ये विविध कारणांनी सहभागी झालेले नाहीत. वेस्ट इंडिजचे गतवैभव केव्हाच संपले आहे, उरल्या केवळ आठवणी. फलंदाजीचे वैभव तर गेलेच पण गोलंदाजीचा तोफखानाही इतिहास जमा झाला आहे. कॅरन पोलार्ड, ड्‌वेन ब्राव्हो, ख्रिस गेलसारखे बलाढ्य खेळाडू अन्य देशांत होत असलेल्या आयपीएलसारख्या स्पर्धांमध्ये खेळतात, कारण वेस्ट इंडिज मंडळाकडून मिळणारे मानधन असे असते की त्यात ना मान असतो ना धन असते.

पुर्वी त्यांच्या संघात उंचेपुरे, धडधाकट खेळाडू सातत्याने येत होते, आता हेच खेळाडू क्रिकेट सोडून अमेरिकेत एनबीए बास्केटबॉल खेळायला जातात, कारण तिथे क्रिकेटपेक्षाही जास्त पैसा मिळतो. ज्या काळात भारतीय क्रिकेटपटूंना पाच दिवसांच्या कसोटी सामन्याचे प्रत्येक दिवसाचे केवळ 50 रुपये तरी मिळायचे, त्या काळात वेस्ट इंडिजचे काही खेळाडू सामन्याचा दिवस संपला की इतर ठिकाणी अन्य नोकरी करायचे. आपले क्रिकेट मंडळ जसे गरीब होते, त्यापेक्षाही हालाकीची परिस्थिती इंग्लंड व ऑस्ट्रेलियावगळता बाकी देशांची होती. 1983 च्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर ज्या प्रकारे आपल्या मंडळाकडे पैशांचा ओघ नव्हे तर धबधबा सुरू झाला तसा अन्य देशांकडे नव्हता आणि आजही नाही. आजच्या घडीला भारतीय संघ जर खेळत असेल तरच इतर देशांना पैसे मिळतात, अन्यथा ओम भवती भिक्षांदेही सुरू असते. 1995 नंतर आतापर्यंत आपण वेस्ट इंडिजचे दौरे केले त्यात वर्चस्व गाजविले.

हे भारतीय संघ बलाढ्य होता म्हणून घडले असे नाही तर प्रतिस्पर्धी कमकुवत होता हे देखील एक कारण आहे. यंदाच्या मालिकेतही हेच घडले. तशीच काहीशी परिस्थिती वेस्ट इंडिजसह दक्षिण आफ्रिकेचीही होती. मोईन अली, अब्राहम डिवीलर्स निवृत्त झाल्याने आणि ग्रेट वेगवान गोलंदाजांची कमतरता असल्याने भारतासमोर आव्हानही निर्माण झाले नाही. एक मान्य करतो की आजच्या घडीला ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क सोडला तर गोलंदाजीची भीती वाटावी अशी गोलंदाजी फक्त भारतीय संघाकडे आहे. जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, उमेश यादव, महंमद शमी आणि भुवनेश्वर कुमार असा ताफा कोहलीच्या संघाकडे आहे. त्यातही रवीचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव व यजुर्वेंद्र चहल असे अत्यंत गुणवान फिरकी गोलंदाजही आपण मिरवत आहोत. पण क्‍लाईव्ह लॉईड, अलन बोर्डर, स्टीव्ह वॉ, हॅन्सी क्रोनिए किंवा ग्रॅमी स्मिथ यांचा संघ जसा होता तसा आज एकही संघ नाही. नाही म्हणायला ऑस्ट्रेलियाकडे त्या दर्जाचे फलंदाज आहेत, पण या संघाला जागतिक स्तरावर यश मिळवून देणारा कर्णधार त्यांच्याकडे नाही.

दिशा भरकटणारी गुणवत्ता काही कामाची नसते, हे इंग्लंडच्या संघाकडे पाहून लक्षात येते. आयसीसीच्या भुक्कड नियमांमुळे विश्‍वकरंडक जिंकलेला हा संघ सध्या जो रुटवर नव्हे तर बेन स्टोक्‍सवर भरवसा ठेवून आहे. नाही म्हणायला न्यूझिलंडचा संघ सध्या सातत्य दाखवत आहे. इंग्लंडविरुद्ध पिछाडीवर असूनही त्यांनी डावाने विजय मिळविला. पाकिस्तानचा संघ तर अंतर्गत राजकारणातून अद्याप बाहेर निघालेला नाही त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ऑस्ट्रेलियानेही डावाने विजय मिळविला. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिकेनंतर भारतीय संघाने बांगलादेशाला देखील व्हाइटवॉश दिला. दोन्ही कसोटी सामने डावाने जिंकताना कोहलीच्या संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिनही क्षेत्रात वर्चस्व राखले. सट्टेबाजांनी संपर्क साधल्याचे वेळेवर आयसीसीला सांगितले नाही म्हणून कारवाई झाल्याने त्यांचा सर्वात अनुभवी खेळाडू शकिब अल हसनला भारताविरुद्धच्या मालिकेत खेळता आले नाही.

तसेच मशरफी मोर्तझा याच्यासह तमिम ईक्‍बाल, खलिद मसुद, शहरयार हुसेन यांच्यासारखे खरे गुणवान खेळाडू आज त्यांच्याकडे नाहीत. महंमदुल्ला याच्या नेतृत्वाखाली भारतात आलेला बांगलादेश संघ नव्या खेळाडूंचा होता, साहजीकच त्यांना भारतात खेळण्याचा फारसा अनुभव नव्हता. हा संघ व त्यांची कामगिरी पाहिली की असा खेळ काय भारतातील एखादा क्‍लब दर्जाचा संघही करू शकतो असे वाटून गेले. असो, आता हा कसोटीचा चित्रपट संपला असून भारतीय संघ मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आता भारतीय संघ पुढील वर्षाच्या सुरुवातीला न्यूझिलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे, त्यावेळी किवींना त्यांच्याच देशात आपण असेच तीन दिवसांत पराभूत करतो का हे पाहणे महत्त्वाचे आहे. तसेच त्यानंतरच्या ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्धच्या मालिका त्यांच्याच देशात कशा जिंकतो यावरही लक्ष राहील. तिथेही कोहलीचा संघ तीन दिवसांचे क्रिकेट खेळतो का तिन दिवसांचा तमाशा ते स्पष्ट होईल.

टी-20 मुळे नुकसान
कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट असे मानले जाते. मात्र एकदिवसीय सामनेही रटाळ व्हायला लागले व टी-20 चा उदय झाला. आता तर काय टी-10 क्रिकेटही सुरू झाले आहे. या वेगवान क्रिकेटमुळे खेळाडूंना आर्थिक स्थैर्य येत असले तरी कसोटी फलंदाज मिळण्याची खाण बंद पडत चालली आहे. खेळपट्टीवर पूर्ण दिवस नांगर टाकून उभे राहणे, संघाला विजय मिळवून देण्यासाठीच नव्हे तर सामना वाचविण्यासाठी संयमी फलंदाजी करणारे फलंदाज मोजायला एका हाताची पाच बोटे देखील पुरे पडतील अशी स्थिती आहे. या क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेट गतवैभव गमावून बसले आहे.

दिवसरात्र कसोटी हीच आशा
सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष झाला व त्याच्या विनंतीला मान देत आधी कोहलीने व नंतर बांगलादेश क्रिकेट मंडळाने कोलकाता कसोटी दिवसरात्र पद्धतीने खेळली. यात भारताने डावाने विजय मिळविला हे ठीक पण कसोटी क्रिकेटला पुन्हा एकदा लोकप्रियता मिळवून देण्यासाठी एक चांगला पर्याय देखील समोर आला. दिवसरात्र का होईना पण कसोटी क्रिकेटला नुसतेच जिवंत ठेवायचे नाही तर त्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचेच आज खरे आव्हान आहे.

– अमित डोंगरे

Leave A Reply

Your email address will not be published.