भारतीय फलंदाजांची इंग्लंडमध्ये कसोटी….

अमित डोंगरे
भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. टी-20 व एकदिवसीय मालिकेनंतर आता भारताच्या कागदावरच्या बलाढ्य फलंदाजीची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. एजबस्टन येथील पहिल्या सामन्याने या दीर्घ कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.
इंग्लिश वातावरणात भारतीय फलंदाजी बहरेल, का पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशीच अवस्था होईल, ते आता कळणार आहे. भारताची सलामी प्रत्येक सामन्यात आणि प्रत्येक डावात कशी होते यावरच सर्व काही अवलंबून आहे. शिखर धवन आणि मुरली विजय भारतीय उपखंडात यशस्वी ठरतात, पण परदेशात अपयशी ठरतात. हा शिक्का पुसून टाकण्याची त्यांना नामी संधी आहे. परदेशातील वातावरणात खेळपट्टीचा सर्वात जास्त अनुभव आज चेतेश्‍वर पुजाराकडे आहे.
त्यामुळे तोच या दौऱ्यात आपले ‘ट्रम्प कार्ड’ असणार आहे. कर्णधार विराट कोहली तुफान भरात असला तरी त्याची इंग्लंडमधील आजवरची कामगिरी खुपच सुमार आहे. त्यामुळे त्यात सुधारणा करण्याचे दडपण त्याच्यावर राहणार आहे. अर्थात आजवरचा इतिहास पाहता दडपणाखालीच विराटचा खेळ हा बहरताना आपण पाहिला आहे. जर याही दौऱ्यात हे समीकरण जमून आले, तर इंग्लंडच्या गोलंदाजीचा पालापाचोळा व्हायला वेळ लागणार नाही.
इंग्लंडच्या वातावरणात कुकाबुरा चेंडू जरा जास्तच स्विंग होतो. त्यामुळे पुजारा, विजय आणि कोहली यांच्यावरच खरी मदार राहणार आहे. इंग्लंडच्या जेम्स ऍन्डरसन आणि कंपनीसमोर आपण कसे खेळतो, मुळातच पहिल्या सामन्यात, पहिल्या डावात फलंदाजी कशी करतो यावरच या संपूर्ण मालिकेचे भवितव्य अवलंबून आहे. सुरुवात विजयाने झाली तर यंदा भारतीय संघ पुन्हा एकदा इतिहास रचेल.
भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्याला रवाना होत असताना आयर्लंडमध्ये दोन टी-20 सामने खेळला. त्यात जिंकला देखील. त्यामुळे आत्मविश्‍वास वाढलेला संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला. या प्रदीर्घ दौऱ्याची सुरुवात टी-20 सामन्यांच्या मालिकेने झाली. ही मालिका भारताने 2-1 अशी जिंकत आपण या दौऱ्यासाठी सज्ज आहोत हेच दाखवून दिले. या मालिकेत शिखर धवन, के. एल. राहुल, रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांची बॅट तळपली.
या मालिकेनंतर भारतीय संघ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळला. यावेळी एकदिवसीय सामन्यांच्या सलग दहा मालिका जिंकण्याची भारताला संधी होती. या मालिकेत इंग्लंड आणि भारत यांनी प्रत्येकी एक सामना जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली. मात्र, तिसऱ्या व अखेरच्या निर्णायक सामन्यात भारतीय फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी घात केला व ही मालिका आपण 2-1 अशी गमावली. रोहित शर्मा, शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली जर मोठी धावसंख्या करायला कमी पडले, तर भारतीय संघ सहज पराभूत होऊ शकतो हे सामन्याने दाखवून दिले.
आता या दोन मालिकांनंतर येत्या एक ऑगस्टपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्‍वर पुजारा, कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा हे आपली जबाबदारी ओळखून कशी फलंदाजी करतात, यावर याही मालिकेचे भवितव्य अवलंबून आहे. गोलंदाजीत विविधता असली तरी इंग्लंडची फलंदाजी आठव्या क्रमांकापर्यंत सर्वोत्तम आहे त्यामुळे भारताला ही मालिका खूपच खडतर ठरण्याची शक्‍यता आहे.
इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन, जॉनी बेरिस्टो, जो रूट आणि बेन स्टोक्‍स हे फलंदाज भरात आहेत. आणि जर भारतीय गोलंदाजांना त्यांना बाद करण्यात लवकर यश मिळाले, तरच भारतीय संघ इंग्लंडवर वर्चस्व गाजवून या मालिकेत आणि या दौऱ्यात चमत्कार घडवू शकेल.
कुकाबुरा चेंडूची धास्ती 
भारतात जे सामने होतात, त्यात एसजी. चेंडू वापरले जातात. त्यामुळे भारतीय खेळाडूंना त्याचा अंदाज असतो. शिवाय भारतातील खेळपट्ट्यांवर हे चेंडू फारसे स्विंग होत नाहीत. मात्र, परदेशातील सामन्यात कुकाबुरा चेंडू वापरले जातात आणि मग भारतीय फलंदाजांची त्रेधा उडते. मुळातच एसजी पेक्षा हे चेंडू जास्त स्विंग होतात. त्यातच इंग्लंडमधील खेळपट्ट्या व सतत बदलणारे लहरी हवामान गोलंदाजांसाठी पूर्णपणे पोषक असते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या कमकुवत फलंदाज सपशेल अपयशी ठरतात. अर्थात आता आपल्याकडे देखील आता चांगले स्विंग गोलंदाज आहेत. की जे इंग्लिश फलंदाजीला खिंडार पाडू शकतील. पण एकूणच प्रत्येक परदेश दौऱ्यात आपल्या फलंदाजांना या कुकाबुरा चेंडूची धास्ती असतेच.
पुजारा, कोहलीवरच भिस्त 
या कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या फलंदाजीची प्रमुख भिस्त चेतेश्‍वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांच्यावरच असणार आहे. हे दोघेही तंत्रशुध्द फलंदाज असल्याने त्यांच्या बॅटमधून धावा झाल्या, तरच भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारून इंग्लंडवर दडपण आणू शकतो. मात्र, या दोघांनाही सहजपणे फलंदाजी करायची असेल, तर प्रत्येक डावात सलामी चांगली मिळाली पाहिजे. दुसऱ्या बाजूने म्हणजे इंग्लंडच्या बाजूने विचार केला तर त्यांचेही टार्गेट पुजार आणि कोहलीच असणार आहेत. या दोन विकेट मिळाल्या की भारतीय फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळते, हा इतिहास आहे. या संपूर्ण मालिकेत इंग्लंडचे गोलंदाज याच दोघांना रोखायचा प्रयत्न करणार हे उघड आहे त्यावर मात करण्यात पुजारा व कोहली यशस्वी ठरले, तर मात्र एक नवा इतिहास घडेल.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)