इस्लामाबाद: पाकिस्तानच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत श्रीलंका क्रिकेट मंडळाने दौरा करण्यासाठी होकार कळविला आहे. त्यामुळे एका दशकानंतर कसोटी क्रिकेट पाकिस्तानात परतणार आहे.
श्रीलंकेने डिसेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्याची तयारी दर्शविली आहे. श्रीलंकेने यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानात वन डे आणि टी-20 मालिका खेळली होती.
आता याच दोन संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना 11 ते 15 डिसेंबरदरम्यान रावळपिंडीत, तर दुसरा सामना 19 ते 23 डिसेंबरला कराचीत होईल. श्रीलंकेने पाकिस्तानमध्ये येण्यास होकार दिल्यामुळे देशात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट येथे परतणार आहे.
श्रीलंकेच्या संघानेच पाकिस्तानमध्ये 2009 ला अखेरचा कसोटी सामना खेळला होता. यावेळी दहशतवाद्यांकडून लाहोरमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंच्या बसवर हल्ला केला होता. यानंतर पाकिस्तानमध्ये खेळण्यास आंतरराष्ट्रीय संघांनी नकार दिला.