घाझ्नी – अफगाणिस्तानात सध्या एका मुलीची जोरदार चर्चा आहे. आई वडिलांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या 16 वर्षाच्या मुलीचे सर्वच स्तरातून कौतुक होते आहे. अफगाणिस्तान सरकारला पाठींबा देणाऱ्या तिच्या आई-वडिलांची तालिबानींकडून हत्या करण्यात आली. तिच्या डोळ्यादेखत आई-वडिलांना तालिबान्यांनी घरातून फरफटत बाहेर नेले आणि गोळ्या घातल्या. त्यानंतर या मुलीने त्या दोन्ही तालिबानींना गोळ्या घालून ठार केले आणि अनेक तालिबानींना जखमी केल्याची चर्चा सुरू आहे.
क्वामार गूल असे या मुलीचे नाव आहे. येथील घोर प्रांतात ती कुटुंबीयांसोबत राहत होती. तालिबानी तिच्या वडिलांना शोधत घरापर्यंत आले. तिचे वडील सरकारचे समर्थक होते. त्यामुळे तालिबानी त्यांच्या घरी आले आणि त्यांना खेचत घराबाहेर आणले. जेव्हा त्याच्या पत्नीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तालिबानींनी तिलाही घराबाहेर फरफटत आणले आणि दोघांची हत्या केली. त्यानंतर गूलने घरातील बंदूक हातात घेतली आणि आई-वडिलांची हत्या करणाऱ्यांना पहिल्या गोळ्या झाडल्या. त्यानंतर इतरांना जखमी केले.
गूलचे वय 14 ते 16 वर्षांचे असेल. त्यानंतर काही तालिबानी तिच्यावर हल्ला करण्यासाठी परतले, परंतु गावकऱ्यांनी आणि सैनिकांनी त्यांना हद्दपार केले. अफगाणिस्तान सुरक्षा रक्षकांनी गूल आणि तिच्या भावाला सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.