पेशावर – अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेल्या पूर्वीच्या वायव्य आदिवासी क्षेत्रात दहशतवाद्यांनी स्वयंसेवी संस्थांशी संबंधित 4 कार्यकर्त्या महिलांची हत्या केली आणि एकाला जखमी केले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या महिला कार्यकर्त्या जात असलेल्या वाहनावर संशयित दहशतवाद्यांच्या गटाने बेछुट गोळीबार केला. त्यामध्ये या वाहनाचा चालकही जखमी झाला. हा हल्ला उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात मीर अली गावाजवळच्या एपि नावाच्या खेडेगावात झाला, असे स्थानिक पोलीस अधिकारी इक्बाल खान यांनी सांगितले. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घ्यायला सुरुवात केली असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख शफी उल्लाह खान यांनी सांगितले.
हल्ल्यानंतर हल्लेखोर जवळच्या डोंगरांवर पळून गेले. आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. या महिला कार्यकर्त्या घरातून व्यवसाय करण्यास इच्छुक असलेल्या महिलांना प्रशिक्षण आणि त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करणाऱ्या साबावन पाकिस्तानी या सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्या होत्या. या महिला कार्यकर्त्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू शहरातून मीर अलीमध्ये गेल्या होत्या. या महिला या भागात येणार असल्याचे दहशतवाद्यांना आगोदरच माहित होते आणि ते महिला येण्याची वाट पहात होते, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.