इस्लामाबाद – अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांनी काल रात्री पाकिस्तानच्या सीमेजवळच्या लष्करी ठाण्यावर हल्ला केला. यावेळी झालेल्या जोरदार गोळीबारादरम्यान तीन सैनिक ठार झाले, असे पाकिस्तानच्या सैन्याच्यावतीने सांगण्यात आले. पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तान प्रांताच्या सीमेजवळच्या लष्करी ठाण्याजवळ ही घटना घडली. त्यामध्ये काही जण ठार झाले असे लष्कराने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र कोणत्याही त्रयस्थ माध्यमाकडून या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही.
अफगाणिस्तानमध्ये अलिकडच्या दिवसात सतत बॉम्बस्फोट घडवून आणले जात आहे. त्यातच उत्तर कुंदुझ प्रांतातल्या मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 23 जण ठार झाले होते. तर एका धार्मिक शाळेजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 7 मुले ठार झाली होती. या बॉम्बस्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेट-खोरसान या इसिसशी संबंधित संघटनेने घेतली आहे.
हे हल्ले प्रामुख्याने शिया समुदायाला लक्ष्य करण्यासाठी केले गेले होते. अफगाणिस्तानमध्ये “आयएस-के’ शिवाय तेहरीक ए तालिबान पाकिस्तान ही दहशतवादी संघटनाही सक्रिय आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार या संघटनेत 10 हजार सदस्य कार्यरत आहेत.