पुणे – एटीएसने दहशतवाद्यांकडे केलेल्या तपासात तब्बल 500 जीबी डाटा सापडला आहे. यामध्ये शहरातील काही स्थळांचे गूगल इमेज सापडले आहेत. मात्र चित्रीकरणासाठी वापरलेल्या ड्रोनचे इमेज अद्याप हाती लागले नाही. ड्रोनचा फॉरेन्सिक अहवाल अद्याप प्रलंबित आहे, तर दुसरीकडे आजवरच्या तपासात दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राजकीय नेता किंवा आगामी सण-उत्सव नसल्याचे पुढे आले आहे. मात्र त्यांचा उद्देश आणि टार्गेट कळण्यासाठी आणखी काही काळ तपास करावा लागणार आहे. तपासात उघड होणारी माहिती ही नक्कीच महत्त्वाची असेल, असे एटीएसच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
कोथरूड पोलिसांनी वाहनचोरी करताना महम्मद इम्रान मोहंमद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (23) आणि मोहंमद युनूस मोहंमद याकूब साकी (24, दोघेही रा. मिठानगर, कोंढवा, मूळ रा. हरमाला कुलकुंडी, रतलाम, मध्य प्रदेश) या दोघांना पकडले होते. त्यांच्या तपासात दोघेही एनआयने वॉंटेड जाहीर केलेले दहशतवादी निघाले. दरम्यान, प्रकरणाचा तपास नऊ दिवसांपूर्वी एटीएसकडे सोपवण्यात आला. एटीएसने वेगाने तपास करत दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी अब्दुल पठाण याला कोंढव्यातून अटक केली. तर त्यांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी कोंढव्यात राहणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअर सिमाब नसरुद्दीन काझी (27, रा. कौसर बाग, मूळ रत्नागिरी) याला रत्नागिरी येथून अटक केली.
तपासादरम्यान एटीएसला अनेक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. एटीएसची काही पथक दोघांचा फरार साथीदार महमद आलम (31) याच्या मागावर आहेत. तर सध्या अटकेत असलेल्या दोघा दहशतवाद आणि त्यांच्या दोन साथीदारांची कसून चौकशी करत आहेत. चौकशीत त्यांचे आणखी काही साथीदार असल्याचे निष्पन्न होत आहे. यामुळे मुख्य सूत्रधार कोण हे लगेचच सांगणे योग्य होणार नाही, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
तर त्यांच्याकडे सापडलेले साहित्य आणि केमिकल हे बॉम्ब बनविण्यासाठीच होते आणि त्याची चाचणी कोल्हापूर, सातारा आणि पुण्यातील जंगलात झाल्याची माहिती बरोबर असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याकडे मुंबईतील छाबाड हाऊसचे छायाचित्र सापडले म्हणून ते टार्गेट होते असे म्हणणे योग्य ठरणार नाही, कारण की त्या व्यतिरिक्तही आणखी काही छायाचित्रे त्यांच्याकडे सापडली आहेत. तर सापडलेल्या 500 जीबी डाटामध्ये प्रक्षोभक व्हिडिओ, ब्रेनवॉश करणारी भाषणे आणि लेखी साहित्य सापडले आहे.
ग्राफिक्स डिझायनर फक्त नावालाच
खान आणि साकी स्वत:ला ग्राफिक्स डिझायनरचे काम करत असल्याचे सांगत असले, तरी ते प्रत्यक्षात दहशतवादी कारवायांसाठीच पुण्यात दाखल झाले होते. तर त्यांना आश्रय देणाऱ्या पठाणचाही ग्राफिक्स डिझायनिंगचा व्यवसाय नसून ते त्याआडून दोघांनाही मदत करत असल्याचे पुढे आले आहे. स्वत:च्या बचावासाठी तिघेही ग्राफिक डिझायनिंग व्यवसायाचा आसरा घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांना यासाठी लागणारे पैसे सिमाब काझी पुरवत होता. त्याच्या पैशावरच तिघेही मागील दीड वर्ष पुण्यात राहून ठिकठिकाणी रेकी, बॉम्बस्फोटाची चाचणी आणि संवेदनशील ठिकाणांची माहिती काढत होते.
राज्यभर भ्रमंती आणि टेंटमध्ये मुक्काम
खान आणि साकी यांनी राज्यातील अनेक शहरांना भेटी दिल्या आहेत. तेथे ते एकेकदाच गेले आहेत. मात्र, तेथे गेल्यावर त्यांनी राहण्यासाठी कोणते हॉटेल बुक केले नाही. ते जाताना सोबत टेंट घेऊन जात होते. हा टेंट जंगलात किंवा आडबाजूला लावून ते मुक्काम करत होते. दोघांचा ब्रेनवॉश अशा प्रकारे झाला आहे, की ते तपासाला सहकार्य करत नाहीत. तसेच अनेकदा दिशाभूल करत आहेत. मात्र, इतर सर्व माहिती आणि त्यांच्याकडे केलेला तपास याची एकत्रित अभ्यास करुन एटीएस एक-एक पाऊल पुढे जात आहे.