पेशावर: पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा भागात सुरू असलेल्या एका स्थानिक क्रिकेट सामन्यात दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात जीवितहानी झाली याबाबत मात्र, कोणतीही माहिती मिळालेली नाही.
येथील एका गावात स्थानिक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होता. अमन क्रिकेट लीग असे या स्पर्धेचे नाव आहे. या सामन्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. यात काही रायकीय व्यक्ती व माध्यमांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. त्यावेळी मैदानाच्या शेजारील डोंगरावरून दहशतवाद्यांनी अंधाधूंद गोळीबार सुरू केला. त्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला व खेळाडूंसह प्रेक्षकही सैरावैरा धावत सुटले. त्यांच्यावरही गोळीबार करण्यात आला.
केवळ मैदानातच नाही तर आजूबाजूच्या परिसरातील काही सरकारी कार्यालयांमध्येही तोडफोड केली गेली. जमियत उलेमा-ए-इस्लाम पक्षाचे स्थानिक नेते हाजी कासिम गुल देखील प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.
या घटनेनंतर आयोजकांनी हा सामना रद्द झाल्याचे जाहीर केले. या गावातील परिसरात डोंगर असून तिथे दहशतवाद्यांचे तळ असल्याची माहिती तेथील पोलिसांनाही दिली आहे. मात्र, पोलिसांना घटनास्थळी दाखल होण्यासाठी उशीर का झाला अशी विचारणा प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांशी बोलताना केली आहे.