पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती करण्यासाठी दहशतवादी सज्ज

राज्यात सुरक्षा यंत्रणेकडून हाय अलर्ट जारी

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याची आठवण आणखी ताजी असतानाच आता दहशवादी संघटना जम्मू-काश्‍मीरमध्ये पुन्हा दुसरा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयीची गुप्त माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली असून राज्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

दहशतवादी संघटना श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा पुलवामासारख्या घटनेची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी दहशतवादी संघटना सुरक्षा दलाची वाहनांना लक्ष्य करणार असल्याची माहिती मिळत आहे. दहशतवादी महामार्गावर दहशतवादी लष्कराच्या वाहनांना कार बॉम्बने उडवण्याचा कट रचत आहेत. गुप्तचर यंत्रणांना त्याचे इनपुट मिळाल्यानंतर राज्य पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे. तसेच अन्य सुरक्षा संस्थांनाही सतर्क राहण्यास सांगितले आहे.

दहशतवादी हल्ल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनीही सुरक्षा यंत्रणांना दिली आहे. त्यामध्ये कारबॉम्ब आणि आयईडी लावून हल्ला करण्याची योजना आखली जात आहे. अशी कार तयार करण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घेतली जाण्याची शक्‍यतादेखील वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानने पाठविलेले दहशतवादी हे अशा घटना घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने लष्कर, हिजबुल आणि जैश यांना वेगवेगळ्या ठिकाणी हल्ल्यांसाठी क्षेत्रांचे वाटप केले असल्याचेही सांगण्यात आले आहे.

पुलवामावर हल्ला करण्यासाठी लष्कर, हिजबुल आणि जैश या तिन्ही दहशतवादी संघटनांची नुकतीच एक बैठक झाली. यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना हल्ल्याचे संपूर्ण नियोजन करण्याचे त्यांच्या मालकांनी आदेश दिले आहेत. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांना अंतर्गत भागात पोलिस कर्मचारी आणि राजकीय लोकांवर हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची धक्कदायक माहितीदेखील समोर आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)