नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येच्या कट रचल्याप्रकरणी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीने अहवाल तयार केला आहे. अहवालानुसार, आरोपी भारतीय एजंटविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. दीर्घ तपासानंतर समितीने आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे. तथापि, एजंटचे नाव अद्याप उघड केलेले नाही.
२०२३ मध्ये न्यू यॉर्कमध्ये भारतीय एजंटांनी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा अमेरिकेचा आरोप झाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले होते. बुधवारी गृह मंत्रालयाने सांगितले की, दीर्घ चौकशीनंतर समितीने एका व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाईची शिफारस केली आहे. तथापि, गृह मंत्रालयाच्या निवेदनात कारवाई सुरू करण्यात आलेल्या कोणाचेही नाव देण्यात आलेले नाही.
गृह मंत्रालयाने सांगितले की, काही संघटित गुन्हेगारी गट, दहशतवादी संघटना, ड्रग्ज तस्कर इत्यादींच्या कारवायांबद्दल अमेरिकन अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये भारत सरकारने एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली होती. गृह मंत्रालयाने सांगितले की समितीने स्वतःचा तपास केला आणि अमेरिकेने दिलेल्या पुराव्यांचेही परीक्षण केले. अमेरिकन अधिकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळाले, त्यानंतर विविध एजन्सींमधील अनेक अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आणि या संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे देखील तपासण्यात आली.