दहशतवादी मोहम्मद यासीन बटला गुजरात एटीएसकडून अटक

अक्षरधाम मंदिर हल्ल्यामागील कटाचा सूत्रधार जाळ्यात 

गांधीनगर: पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य मोहम्मद यासीन बट याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यामुळे गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर 2002 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागील कटाचा सूत्रधार जाळ्यात सापडला आहे. गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ती महत्वपूर्ण कारवाई केली. बट याला जम्मू-काश्‍मीरच्या अनंतनागमध्ये पकडण्यात आले.

गुजरातच्या गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिर परिसरात दोन दहशतवाद्यांनी 24 सप्टेंबर 2002 यादिवशी हल्ला केला. त्यांनी केलेल्या गोळीबारात 33 जण मृत्युमुखी पडले. त्यामध्ये नॅशनल सिक्‍युरीटी गार्डच्या (एनएसजी) एका कमांडोचाही समावेश होता. त्या हल्ल्यानंतर एनएसजीच्या कमांडोंनी केलेल्या कारवाईत दोन्ही दहशतवादी मारले गेले. त्या दहशतवादी हल्ल्यानंतर बट याने पाकव्याप्त काश्‍मीरला पलायन केले.

गुजरात एटीएसच्या दाव्यानुसार बट याने त्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावली. तो हल्ला तडीस नेण्यासाठी काही दहशतवादी उत्तरप्रदेशातून रेल्वेने अहमदाबादमध्ये दाखल झाले. त्यांना एके-47 रायफल्ससह दारूगोळा बट याने पुरवल्याचा आरोप आहे. तो जम्मू-काश्‍मीरला परतल्याची आणि अनंतनागमधील लाकडाच्या वखारीत काम असल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाली. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने बट याला पकडण्यात आले. अटकेनंतर त्याला गुजरातला नेण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)