‘नागरोटा’तील दहशतवादी हल्ल्यामागे ‘मसूद अझहर’च्या भावाचा हात

- "आयएसआय'ने दिले होते आत्मघातकी हल्ल्याचे उद्दिष्ट - सीमेजवळच्या कॅम्पमध्ये झाले होते जिहादींचे प्रशिक्षण

नवी दिल्ली – दोनच दिवसांपूर्वी नागरोटा इथे झालेल्या चकमकीदरम्यान मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानस्थित जैश ए मोहंम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अझहरच्या भावानेच मदत केली होती.

तसेच पुलवामामध्ये ज्या प्रमाणे निमलष्करी दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला गेला होता, तसाच हल्ला करण्यासाठी या दहशतवाद्यांना सांबा भागागून 18-19 नोव्हेंबरला भारतीय हद्दीमध्ये घुसवण्यात आले होते.

पाकिस्तानातील गुप्तहेर संघटना “इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स’ अर्थात “आयएसआय’ने “जैश’च्या या दहशतवाद्यांना आत्मघातकी हल्ल्याचे लक्ष्य दिले होते, अशी माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

“आयएसआय’ने “जैश’ला जरी पुलवामापेक्षाही मोठ्या हल्ल्याचे उद्दिष्ट दिले असले. तरी या हल्ल्याची प्रत्यक्ष आखणी मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ असगर याने केली होती. त्यानेच या हल्ल्यासाठी भारतीय सीमेजवळच्या शाकरगढ येथील जैशच्या शिबिरातील चार जिहादींची निवड केली होती.

असगर याच्या बरोबर जैशचा वरिष्ठ कमांडर काझी तरार याच्यावर या हल्ल्यासाठीच्या आखणीची जबाबदारी सोपवली गेलेली होती. या आखणीसाठी बहावलपूर येथील जैशच्या मुख्यालयात एक बैठकदेखील घेतली गेली. त्या मिटींगला असगर आणि तरार व्यतिरिक्‍त मौलाना अबु जुंदल आणि मुफ्ती तौसिफ हे जैशचे दहशतवादी आणि “आयएसआय’चे अधिकारीही उपस्थित होते.

प्राथमिक आखणी झाल्यावर हल्ल्याचे नियोजन, जिहादींची निवड आणि त्यांचे प्रशिक्षण करण्याची जबाबदारी शाकरगढ कॅम्पवर सोपवली गेली. निवडल्या गेलेल्या जिहादींना आधुनिक शस्त्रांचे प्रशिक्षण दिले गेले आणि भारतीय सुरक्षा दलंची जास्तीत जास्त हानी करण्याचे ध्येय देण्यात आले.

सांबा भागातील नदीकिनारच्या नाल्याच्य मार्गाने हे दहशतवादी भारतीय हद्दीत घुसले. सांबापासून 6 किलोमीटरवर एका ट्रकने त्यांना प्रवासास मदत केली गेली. जैशचे बहुतेक घुसखोर याच मार्गाचा अवलंब करत असतात.

पहाटे 4.475 वाजता सुरक्षा रक्षकांनी हा ट्रक अडवल्यावर चालक अंधारात पळून गेला. तर ट्रकमधील दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमकीला सुरुवात झाली. आत्मसमर्पण करायच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून जैशच्या दहशतवाद्यांनी जिहादी घोषणा द्यायला सुरुवात केली. चकमकीदरम्यान चारही दहशतवादी मारले गेले आणि त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त केला गेला. त्यामध्ये 11 एके रायफली, 23 मॅगझीन, 29 ग्रेनेड, 10 अंडर बॅरेल ग्रेनेड लॉंचर, जीपीएस यंत्रणा आणि वेळा जुळवलेली कॅसिओ घड्याळे होती.

तपासाला वेग…
भारतीय हद्दीत शिरल्यापासून हे दहशतवादी सातत्याने अब्दुल रौफ असगर आणि काश्‍मीरमधील सहायक मोहंम्मद असगर खान काश्‍मीरीच्या संपर्कात होते. या दहशतवाद्यांना भारतात घुसण्यास आणि काश्‍मीर पर्यंत पोहोचण्यास आणखी कोणकोणाची मदत मिळाली होती, याचीही माहिती मिळवण्याचा प्रयत्न आता तपास अधिकारी करत आहेत. अशाच प्रकारे भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न आणखी किती दहशतवादी करत आहेत, याचाही तपास केला जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.