श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी दहशतवाद्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली. ती घटना अनंतनाग जिल्ह्यात घडली. मोहम्मद अश्रफ बट असे हत्या झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
बट एका मशिदीत नमाज पठणासाठी गेले होते. तिथून घरी परतत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बट यांना उपचारासाठी तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
निरीक्षक पदावर कार्यरत असणारे बट पुलवामा जिल्ह्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात रूजू होते. दरम्यान, पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) पथकाला लक्ष्य करून गोळीबार केला. त्यामध्ये एक जवान जखमी झाला.
गोळीबारानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. त्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आल्याचे समजते.