श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलांशी रात्रीच्या वेळी झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.
तेथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरातील कांदिपोरा येथे बुधवारी शोधमोहीम सुरू केली होती. शोध मोहिमेदरम्यान, दहशतवाद्यांना शरण येण्याचे अवाहन करण्यात आले.
तथापि, त्यांनी संयुक्त सुरक्षा पथकावर अंदाधुंद गोळीबार केला, आणि प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईदरम्यान चकमकीला सुरुवात झाली, असे या अधिकाऱ्याने सांगितले. अंधारामुळे बुधवारी सायंकाळी कारवाई स्थगित करण्यात आली. परंतु संपूर्ण रात्रभर या परिसरातील नाकाबंदी कायम ठेवण्यात आली.
आज सकाळी पुन्हा दहशतवाद्यांना शरण येण्यासाठी वारंवार घोषणा करण्यात आल्या. परंतु दहशतवाद्यांनी संयुक्त शोध पथकावर गोळीबार केला आणि याचे प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईत लपलेल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, असल्याचे त्यांनी सांगितले. चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रे आणि दारूगोळ्यांसह मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी साहित्य जप्त केले गेले.
आदिल अहमद भट आणि जाहिद अहमद राथर असे ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. पोलिसांच्या नोंदीनुसार दोन्ही दहशतवादी गुन्हेगारीच्या अनेक घटनांमध्ये सहभागी होते, असे या अधिकाऱ्याने सांगितले.