श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत एक दहशतवादी जखमी झाला. त्याला अटक करण्यात सुरक्षा जवानांना यश आले. ती घटना अनंतनाग जिल्ह्यात घडली. दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी संबंधित ठिकाणी मोहीम हाती घेतली.
त्यावेळी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झडली. त्यामध्ये झहीर अब्बास लोन हा दहशतवादी जखमी झाला. त्याला जवानांनी शिताफीने पकडले. दरम्यान, अनंतनाग जिल्ह्यातील दुसऱ्या घटनेत दहशतवाद्यांनी जवानांच्या पथकाला लक्ष्य करून ग्रेनेड डागला.
त्याच्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान जखमी झाला. त्या जवानाला उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. ग्रेनेड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी मोहीम हाती घेतली.