दहशतवादी हल्ल्यांवरून कॉंग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा

गुप्तचरांच्या अपयशाबाबत उत्तर देण्याची मागणी

नवी दिल्ली: जम्मू-काश्‍मीरमध्ये मागील काही दिवसांतील दहशतवादी हल्ल्यांत जवानांचे प्राण गेल्यावरून कॉंग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दहशतवादी हल्ले म्हणजे सरकारचे गुप्तचरविषयक मोठे अपयश आहे. त्याबद्दल सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.

जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवादी हल्ल्यांत आठवडाभरात 10 जवान शहीद झाले. दहशतवादी हल्ल्यांत काही नागरिकही जखमी झाले. त्याचा संदर्भ देऊन कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी सरकारला लक्ष्य करणारे ट्विट केले. मायदेशासाठी जवानांनी दिलेल्या बलिदानाला आम्ही सलाम करतो. आपल्या सुरक्षा दलांच्या शौर्यावर आम्हाला पूर्ण विश्‍वास आहे. मात्र, सातत्याने दहशतवादी हल्ले का घडत आहेत याचे उत्तर सरकारने द्यायला हवे, असे त्यांनी म्हटले. दहशतवादी हल्ल्यांतून कुठला धडा शिकणार का, असा सवालही सुर्जेवाला यांनी केला. त्यामुळे संसद अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर विविध मुद्‌द्‌यांवरून सरकारची कोंडी करण्यासाठी कॉंग्रेस सरसावल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.