काबुल – काबुलमध्ये दहशतवाद्यांनी एका प्रसुती केंद्रावर केलेल्या सशस्त्र हल्ल्यामध्ये किमान 14 जण ठार झाले. या हल्ल्यामध्ये दोन नवजात बालके आणि नुकतेच प्रसुत झालेल्या महिलांचाही अंत झाला. याशिवाय काही परिचारिकांनाही या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला असल्याचे अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रसुतीकेंद्राच्या परिसरात सुमारे तासभर पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. संध्याकाळी उशीरापर्यंत ही धुमश्चक्री सुरू होती. या रुग्णालयातून महिला, नवजात बालके आणि त्यांच्या कुटुंबीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटले आहे.
संपूर्ण काबुल शहराच्या परिसरात अलिकडच्या काळात दहशतवादी हल्ल्यांची मालिकाच सुरू झाली आहे. इस्लामिक स्टेटचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या नानगरहार प्रांताच्या पूर्वेकडील भागात आत्मघातकी हल्लेखोराने एका दफनविधीच्या कार्यक्रमावर केलेल्या हल्ल्यात 21 जण ठार झाले आणि 55 जण जखमी झाले. तर आणि पूर्वेकडील खोस्त प्रांतात बाजारात एका वाहनामध्ये लावलेल्या बॉम्बच्या स्फोटाने एका मुलाचा मृत्यू झाला आणि 10 जण जखमी झाले होते.
बहुसंख्य शियांची वस्ती असलेल्या दाश्ती बराची भागातील रुग्णालयावरील हल्ला सुरू झाल्यावर या भागात काळा धूर भरून राहिला. या रुग्णालयाच्या इमारतीतून 100 हून अधिक महिला आणि बाळांना बाहेर काढण्यात आले असल्याचे गृह मंत्रालयाचे प्रवक्ता तारिक अरीयन यांनी सांगितले. हा हल्ला मानवतेविरूद्ध केलेले कृत्य आणि युद्धगुन्हा आहे, असेही ते म्हणाले. हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधातील कारवाई सुरू होती.
काबूलमध्ये झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी कुणीही ताबडतोब स्वीकारली नाही, काबुलमध्ये तालिबान आणि इस्लामिक स्टेट या दोन्ही दहशतवादी संघटना अफगाण सैन्य, सुरक्षा दले तसेच सामान्य नागरिकांवर वारंवार हल्ले करतात. मात्र हा हल्ला केला नसल्याचे तालिबानने म्हटले आहे.