सीआरपीएफचे 3 जवान शहीद
श्रीनगर : उत्तर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सुरक्षा जवानांना लक्ष्य करून नापाक हल्ला घडवला. त्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) 3 जवान शहीद झाले. कुपवाडा जिल्ह्यातील करालगुंड भागात दहशतवाद्यांनी अचानकपणे सीआरपीएफच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्या हल्ल्यात सीआरपीएफचे काही जवानही जखमी झाल्याचे समजते.
दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सीआरपीएफच्या पथकाने तातडीने प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यात एक दहशतवादीही मारला गेला. हल्लेखोर दहशतवाद्यांना घेरण्यासाठी घटनास्थळी तातडीने अतिरिक्त सुरक्षा बळही पोहचले. याआधी रविवारी कुपवाडा जिल्ह्यातच दहशतवाद्यांनी थैमान घातले. त्यांच्याबरोबर झालेल्या चकमकीत लष्कराच्या 2 अधिकाऱ्यांसह 5 सुरक्षा जवानांना वीरमरण आले.
दरम्यान, श्रीनगरमधील नौगाम भागात सोमवारी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. त्या ग्रेनेडच्या स्फोटात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (सीआयएसएफ) एक जवान जखमी झाला. ग्रेनेड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी तातडीने मोहीम हाती घेतली.