श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २ मजूर मृत्युमुखी पडले. मृत मजूर परप्रांतीय असल्याचे समजते. काश्मीर विभागातील गांदरबल जिल्ह्यात एका बोगद्याचे काम सुरू आहे. ते काम करणाऱ्या खासगी कंपनीचे मजूर राहत असलेल्या छावणीवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.
त्या गोळीबारात २ मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर दोघे जखमी झाले. त्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तातडीने दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. मृत मजूर कुठल्या राज्यातील आहेत याविषयीची माहिती तातडीने मिळू शकली नाही.