श्रीनगर – काश्मिरातील एका पोलीस उपनिरीक्षकाची दहशतवाद्यांनी हत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. श्रीनगरातील खन्यार भागात हा प्रकार घडला असून तेथे त्यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या.
ते तेथे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना सौरा रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आज दुपारी 1.35 च्या सुमाराला हा प्रकार घडला. अर्शद अहमद असे या उपनिरीक्षकाचे नाव आहे. या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे.
त्यात दहशतवाद्यांनी त्यांच्यावर मागून गोळ्या झाडल्याचे दिसत आहे. गोळीबार करून दहशतवादी तेथून निघून गेले. त्यांना अडवण्याचा कोठे प्रयत्न झालेला दिसला नाही. पोलिसांनी व अन्य सुरक्षा दलांनी या भागाची नाकेबंदी करून संशयितांचा शोध सुरू केला आहे.