दहशतवाद हा संयुक्‍त धोका – पंतप्रधान नरेंद्र मोदी

श्रीलंकेच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदींनी घेतली वरिष्ठ नेत्यांची भेट

कोलोंबो- श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपला सिरीसेना यांची भेट घेतली. दहशतवाद हा दोन्ही देशांसमोरील संयुक्‍त धोका असून त्याचा मुकाबलाही सामुहिकरितीने आणि केंद्रीत कृतीने करायला हवा, असे मोदी याप्रसंगी म्हणले.

श्रीलंकेमध्ये ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या भीषण आत्मघातकी बॉम्बस्फोट मालिकेनंतर श्रीलंकेला भेट देणारे मोदी हे पहिलेच आंतरराष्ट्रीय नेते आहेत. या हल्ल्यानंतर भारताच्यावतीने सहवेदना व्यक्‍त करण्यासाठी ते श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले आहेत.

ध्यानमुद्रेतील बुद्ध मूर्तीची भेट
सिरीसेना यांनी पंतप्रधान मोदी यांना गौतम बुद्धाची मूर्ती भेट दिली. इस 4 ते 7 व्या शतकातील मूळ ध्यानमुद्रेतील मूर्तीची प्रतिकृती असलेली ही मूर्ती अनुराधापूरा काळातील आहे. पांढऱ्या लाकडावर हाताने कोरलेल्या या मूर्तीला घडवण्यसाठी दोन वर्षांचा काळ लागला होता. श्रीलंकेची राजधानी कोलोंबोमधील सचिवालयाच्या आवारात पंतप्रधान मोदी यांनी अशोक जातीच्या रोपट्याचे रोपण केले. श्रीलंकेतील विरोधी पक्ष नेते महिंद्र राजपक्षे आणि तमिळ नॅशनल अलायन्स या विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाबरोबरही चर्चा केली, असेही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे.

दहशतवाद ह संयुक्‍त धोका असल्यानेच दहशतवादाच्या बिमोडासाठी श्रीलंकेला साथ देण्याची कटिबद्धता आपण व्यक्‍त केली असे मोदींनी म्ह्टले आहे. सिरीसेना यांच्याबरोबर गेल्या 10 दिवसातील मोदी यांची ही दुसरी भेट आहे. मोदींच्या शपथविधीला सिरीसेना उपस्थित राहिले होते, याचा संदर्भ देऊन मोदींनी ट्‌विटवर सिरीसेना यांच्याबरोबरच्या भेटीची माहिती दिली आहे.

सिरीसेना यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी भोजनाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या द्विपक्षीय मुद्दयांवरही चर्चा केली, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्‍ते रवीश कुमार यांनी सांगितले.
सेंट ऍन्टोनी चर्चमध्ये जाऊन ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांना मोदींनी अदरांजली वाहली. ” या हल्ल्यानंतर श्रीलंका पुन्हा सबळ होईल, याचा आपल्याला विश्‍वास वाटतो. भ्याड दहशतवाद श्रीलंकेला पराभूत करू शकत नाही. भारत श्रीलंकेच्या नागरिकांसह एकतेने उभा आहे.’ असे मोदी म्हणाले.

मृतांप्रती सहवेदना व्यक्‍त केल्यानंतर मोदी अध्यक्ष सिरीसेना यांच्या निवासस्थानी आले. रिमझिम पाऊस सुरू असल्याने सिरीसेना यांनी मोदींवर छत्री धरली होती. मोदींनी श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्याशीही चर्चा केली.
श्रीलंकेमध्ये ईस्टर संडेच्या दिवशी 9 ठिकाणी झलेल्या भीषण आत्मघातकी बॉम्बस्फोटंमध्ये 250 पेक्षा अधिक जण मरण पावले होते. तर 400 जण जखमी झाले होते. इस्लामिक कट्टरवादी गट नॅशनल थावहीद जमाथ या संघटनेने हे बॉम्बस्फोट केला असे मानले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.