चिंतन : दहशतवाद

-सत्यवान सुरळकर

दहशतवाद या विषारी सापाचे डोके ठेचण्याची वेळ आली आहे. जगाच्या गळ्याला लागलेला हा दहशतवादी फाशीचा दोर कापून टाकून जगाचा श्‍वास मोकळा करण्याची वेळ आली आहे. अमेरिकेसारख्या महासत्ताक राष्ट्रापासून विकसनशील भारतापासून ते अविकसित श्रीलंका या राष्ट्रालासुद्धा दहशतवादाने ग्रासले आहे.

दहशतवाद हा फक्‍त एका राष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही. त्यामुळे संपूर्ण जगाने एकत्रित येऊन दहशतवाद समूळ नष्ट करायला हवा. नाहीतर दहशतवाद हळूहळू संपूर्ण जग गिळंकृत करून टाकेल. आज भारतातील अनेक प्रांत दहशतवादाच्या दडपणाखाली जगत आहेत. त्यांना मोकळ्या हवेत श्‍वास घेणेही कठीण झाले आहे.

हा दहशतवाद आला कोठून? पुढे दहशतवादाचे आणखी किती भयानक रूप होईल? या मुद्द्यांवर चर्चा करत बसण्यापेक्षा आता प्रत्यक्ष कृतीची गरज निर्माण झाली आहे. श्रीलंकेत इस्टर डे निमित्त चर्चमध्ये जमलेल्या भाविकांवर दहशतवादी हल्ला होणे एक लाजिरवाणी बाब आहे. जगात शांतता नांदावी यासाठी चर्चमध्ये प्रार्थना करणाऱ्या लोकांवर हल्ला होत असेल तर दहशतवाद्यांची माणुसकी मरण पावलेली आहे.

भारतावर होणारे हल्ले हे भारत द्वेषामुळे घडून येतात. मात्र, श्रीलंकेतील हल्ला हा देशावर झालेला हल्ला नसून ख्रिश्‍चन बांधवांना यात लक्ष्य केले गेले आहे असे तरी सध्या दिसत आहे. या घटनेचा संबंध न्यूझीलंड येथे झालेल्या हल्ल्याशी जोडला जात आहे. येथील हल्ला मस्जिदमधील मुस्लीेम लोकांवर केला गेला म्हणून श्रीलंकेत प्रतिहल्ला केल्याचेही बोलले जात आहे.

मात्र, दहशतवादाचा कोणताही चेहरा नाही. त्याला धार्मिक चेहरा देण्याचा अनाठायी प्रयत्न करण्याने काहीही हाती लागणार नाही. मुळात कोणताही धर्म क्षमा आणि शांतता यांचा पुरस्कार करतो. कोणताही धर्म दहशतवादाला जन्माला घालत नाही. त्यामुळे या दोन घटनांमध्ये धर्म शोधण्याचा प्रयत्न करू नये. जर या हल्ल्यांना धर्माचा संबंध जोडला जात असेल तर तो फक्‍त दहशतवाद्यांमुळे जोडला जात आहे.

दहशतवादी जर खरेच धर्माला मानणारे असते तर त्यांनी चर्चवर बॉम्बस्फोट घडवून आणलाच नसता. धर्माची ढाल पुढे करून अनेक सुशिक्षित लोकांना भुरळ पाडून दहशतवादाकडे वळविले जात आहे. आजचा तरुण या दहशतवादाला असाच बळी पडत गेला तर येणारा काळ जगासाठी नक्‍कीच शांततापूर्ण नसणार. आजच्या सुशिक्षित तरुणांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. जेणेकरून त्यांची पावले दहशतवादाकडे वळणार नाहीत. तरुणांना दहशतवादाकडे न वळू देणे हा दहशतवादाला थांबवण्याचा एकच प्रयत्न तरी सध्या दिसतोय.

भारतावर होणारे हल्ले हे प्रामुख्याने पाकिस्तान व चीन या राष्ट्रांशी संबंधित आहे. पाकिस्तानसारखी राष्ट्रे दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे जगाच्या निदर्शनास आले आहे. चीनही अशा राष्ट्रांना साह्य करताना दिसत आहे. भारत अनेक वर्षांपासून दहशतवादाविरुद्ध लढा देत आहे.

अमेरिकेनेही दहशतवादाला इशारा देऊन अनेक कारवायाही केल्या आहेत. मात्र, तात्पुरती कृती न करता कायमस्वरूपी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. अख्ख्या जगाला भयभीत करणाऱ्या दहशतवादाला जमिनीखाली गाडल्यावरच संपूर्ण जगाला शांततेत जगता येईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.