काबुल – काबुल विद्यापिठावर सशस्त्र हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 25 जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. या विद्यापिठामध्ये पुस्तकांचे प्रदर्शन भरले असून त्याला इराणचे राजदूतही उपस्थित राहणार होते.
या बुक फेअरचे उद्घाटन इराणी राजदूत बहादोर अमीनियन व सांस्कृतिक उपक्रमांशी संबंधित अधिकारी मोजताबा नूरोजी करणार होते. मात्र हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर इराणी उच्चपदस्थ विद्यापिठामध्ये उपस्थित होते की नाही, हे समजू शकलेले नाही.
या चकमकीला सुरुवात झाल्यापासून विद्यार्थ्यांनी मिळेल त्या मार्गाने बाहेर पळ काढायला सुरुवात केली. पाच तास चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये ऑटोमॅटिक शस्त्रांबरोबर ग्रेनेड आणि गोळीबाराचे आवाज विद्यापिठाच्या आवारामध्ये घुमत होते.
तीन हल्लेखोरांनी हा हल्ला केला असल्याचे वृत्त आहे. सुरक्षा रक्षकांबरोबरच्या चकमकीमध्ये हे तिघेही हल्लेखोर मारले गेले. संध्याकाळी तालिबानने निवेदन प्रसिद्धीस देऊन या हल्ल्याची जबाबदारी नाकारली आहे.
कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. गेल्या महिन्यात इस्लामिक स्टेटशी संबंधित एका गटाने काबुलमधील शिया बहुल शिक्षणसंस्थेवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 24 विद्यार्थी ठार झाले होते.