करोना काळात शहरातील मृत्यूचे प्रमाण वाढले
दरवर्षीच्या तुलनेत वाढले ५०० ते ७०० मृत्यू
पुणे – करोना प्रादुर्भावाच्या काळात शहरातील एकूण मृत्यूंचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत 483 ने वाढले असून, गेल्या तीन वर्षांच्या सरासरीत मात्र ते समान आहे. शासनाकडून महापालिकेला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट 2020 अखेर शहरात 22 हजार 251 जणांचे मृत्यू झाले. 2019 ची तुलना करता ते 483 ने अधिक आहेत.
मार्चपासून करोना संसर्गाला शहरात सुरुवात झाली. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाले. त्या काळात अपघाती मृत्यूचे प्रमाण म्हणजे रस्ते अपघात वगैरेचे प्रमाण कमी झाले. याप्रमाणे एप्रिलमध्ये गेल्या दोन वर्षांतील मृत्यू पाहता ते 300 ने कमी झाले. मात्र, लॉकडाऊन काहीअंशी शिथिल झाल्यानंतर मृत्यूचा आकडा हजाराने वाढला. जूनमध्ये तो हजाराने कमी झाला. जून 2019 मध्ये शहरात 3,842 जणांचा मृत्यू झाला. मात्र, जून 2020 मध्ये ते प्रमाण सुमारे हजाराने कमी होऊन 2,868 इतक्या मृतांची नोंद झाली.
लॉकडाऊन हटल्यानंतर आणि करोनाचे सामूहिक संक्रमण झाले. त्यामुळे जुलैपासून बाधितांची संख्या दिवसाला दीड-दोन हजारांनी वाढली. याशिवाय ग्रामीण भागातही बाधित वाढले. जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरून पुण्यात उपचारासाठी आलेल्यांची आणि मृत्यू झालेल्यांची संख्याही दिवसाला सरासरी 15 आहे.
गेल्या दोन वर्षांत सरासरी पावणेतीन हजार मृत्यू असलेला, हा आकडा यावर्षी 500 ते 700 ने वाढला आहे. शहरात जुलैमध्ये 3,246 तर ऑगस्टमध्ये 3,262 मृत्यू झाले आहेत. यात महापालिकेला राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार करोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा जास्त आहे.