भयंकर.! लॉकडाऊनमध्ये खायला चारा न मिळाल्यामुळे ‘भोलेनाथा’ने घेतला जगाचा निरोप

पुणे – भगवान महादेवाचे वरदान लाभलेला बैल म्हणून नंदीला विशेष महत्त्व असते. नंदीवाले मोडके तोडके भविष्य सांगतात. त्यावर हा नंदी दोन-तीन वेळा मान हलवून शिक्कामोर्तब करतो. आणि त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. मात्र आता याच नंदीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक शहरातील सर्व राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांना अनिश्‍चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. या बंदीची झळ पिंपरी-चिंचवड शहरातील एका कुटुंबाला बसली आहे. वाल्हेकरवाडी येथे आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली आहे.

वाल्हेकरवाडी येथे पवना नदीच्या घाट परिसरात नंदीवाल्यांचे २५ कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे नंदीबैल तसेच इतर जनावरेही आहेत. सहा नंदी असून एका कुटुंबातील एक सदस्य, असे पाच ते सहा सदस्य मिळून एक नंदी घेऊन शहर परिसरात फिरून उदरनिर्वाह चालवतात. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांच्या फिरण्यावर निर्बंध आले आहेत. त्यांच्याकडे उपलब्ध होता तेवढा चारा त्यांनी नंदीबैल तसेच इतर जनावरांना दिला. मात्र, आता होता तेवढा सगळा चारा संपला असून, हातात पैसा नसल्यामुळे आणखी चारा खरेदीसाठी बाहेर देखील पडता येत नाही. घरा समोरच्या रानातील चारा सुद्धा आता जनावरांना पुरेसा ठरत नाही.

त्यातच वाल्हेकरवाडी येथील सहा वर्षे वयाचा नंदी चाऱ्याअभावी भुकेने व्याकुळ झाला. आणि त्याला आपला जीव गमवावा लागला. नंदीवाल्यांनी त्याचा जीव वाचावा म्हणून अतोनात प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. चारापाणी उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी भुकेने तडफडत त्या नंदीने जगाचा निरोप घेतला.  त्यामुळे “आम्ही आमचे पोट भरू पण मुक्या जनावरांसाठी चारा कुठून आणणार” अशी भावना नंदीवाल्यांकडून व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.