बुलढाणा – समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मेहकर येथील व्यावसायिक बळीराम खोकले यांचा मृत्यू झाला असून इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात औरंगाबाद-मेहकर रस्त्यावर तांदुळवाडी शिवारात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर येथील काही व्यावसायिक औरंगाबाद येथून समृद्धी महामार्गाने मेहकरकडे जात होते. यावेळी अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. व्यावसायिकांची कार तांदुळवाडी परिसरात आली असता चालकाचा कारवरील ताबा सुटून कार दुभाजकाला धडली. अपघात इतका भीषण होता की, दुभाजकाला धडकल्यानंतर तीन-चार पलटी घेऊन कार खड्यात अडकली. कारचा चुराडा झाला आहे. या अपघातात खोकले यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर अधिकृत वाहतूक अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. तरीही काहीजण या मार्गावरून सुसाट गाड्या चालवतात. त्यामुळे महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. समृद्धी महामार्गाचे काम अजूनही सुरू असून यावरून वाहतूक सुरू कशी…? असा सवाल आता उपस्थित होत आहे.