फलटण (प्रतिनिधी) – फलटण-सातारा रस्त्यावर फरांदवाडी, ता. फलटण गावाच्या हद्दीत टोयोटा इटिऑस कारने मोटारसायकल जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील सचिन जयवंत जाधव (रा. आदर्की बुद्रुक, ता. फलटण) हे ठार झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, फलटण-सातारा रस्त्याने साताऱ्याकडून येणाऱ्या टोयोटा इटिऑस (एमएच-42-एए-3222) कारने फलटणकडून आदर्कीकडे निघालेल्या हिरो मोटारसायकलला (एमएच-11-सीए-3432) फरांदवाडी हद्दीत जगताप पेट्रोल पंपासमोर जोरदार धडक दिली.
यामध्ये मोटारसायकलस्वार सचिन जाधव हे गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सचिन जाधव हे भैरवनाथ मल्टिस्टेटच्या फलटण शाखेत कामाला होते. काम संपवून ते आदर्कीला घरी निघाले असताना काळाने त्यांचावर घाला घातला.
अपघातानंतर कारचालक पळून गेला. याप्रकरणी संतोष किसन शिंदे (रा. नवा मळा, ठाकुरकी, ता. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सपोनि नवनाथ गायकवाड तपास करत आहेत.