Dilip Dhotre : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते दिलीप धोत्रे यांच्या कारचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात धोत्रे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या चालकाची प्रकृतीही चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप धोत्रे मुंबईतील काम आटोपून त्यांच्या फॉर्च्युनर कारने पुण्याकडे जात होते. रात्रीच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की गाडीच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अपघातानंतर तातडीने मदतकार्य राबवत धोत्रे आणि त्यांच्या चालकाला जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली दोघांवरही उपचार सुरू आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसून पोलिसांनी वाहन ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या जवळच्या सहकाऱ्याचा अपघात झाल्याची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनीही या घटनेची दखल घेत डॉक्टरांकडून धोत्रे यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. कोण आहेत दिलीप धोत्रे? (Dilip Dhotre) Dilip Dhotre : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; मनसे नेत्याला रुग्णालयात केलं दाखल, प्रकती चिंताजनक दिलीप धोत्रे हे राज ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यात मनसेची बांधणी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या अपघाताची बातमी समजताच मनसे कार्यकर्त्यांनी खळबळ उडाली आहे. हेही वाचा : IAS Transfer : राज्य प्रशासनात पुन्हा मोठे फेरबदल! चार वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या