अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
नागठाणे – पुणे-बंगलोर महामार्गावर काशीळ (ता. सातारा) येथील उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात दुचाकीवरील एका युवकाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला.
दसऱ्यादिवशी पहाटेच्यावेळी हा भीषण अपघात घडला. अमोल प्रवीण माळवदे (वय 21, रा. मूळ रोहिदास चौक, पंढरपूर, सोलापूर हल्ली रा.स्टेशन रोड, तासगाव, सांगली) असे मृत युवकाचे नाव आहे. तर अमित बजरंग सुखदेव (वय 21, रा. निमणी, तासगाव, सांगली) हा युवक गंभीर जखमी झाला आहे.
अधिक माहिती अशी, अमोल माळवदे हा लहानपणापासून तासगाव (सांगली) येथे मामा सुनील रामचंद्र पाटील यांच्याकडे रहावयास आहे. मंगळवारी पहाटे अमोल माळवदे हा अमित सुखदेव यांच्यासह नवीन होंडा डिओ दुचाकीवरून पुणे-कराड लेनवरून निघाला होता. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी काशीळ उड्डाणपुलावरून जात असताना पाठीमागून अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अमोल माळवदे याचा जागीच मृत्यू झाला तर अमित सुखदेव गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णवाहिकेने उपचारासाठी कराड येथे पाठवले. अपघातानंतर धडक देणाऱ्या वाहनासह चालकाने घटनास्थळावरून पलायन केले असून सदर वाहनाचा क्रमांक पोलिसांना सापडला आहे. बोरगाव पोलीस त्या वाहनाचा शोध घेत आहेत. अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हवालदार मनोहर सुर्वे व किरण निकम करत आहेत.