लंडन – दक्षिण लंडन मध्ये हातात धारदार शस्त्र घेऊन दिसेल त्याला भोसकत सुटलेल्या एका दहशतवादी प्रवृत्तीच्या इसमाला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले आहे. स्ट्रीथॅम हाय रोडवर काल हा प्रकार घडला. हा इसम तेथे हातात धारदार शस्त्र घेऊन लोकांना भोसकत होता. त्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. तेथे कार्यरत असलेल्या साध्या वेषातील पोलिसांनी लगेच त्याला घेरून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात जो जागेवरच ठार झाला. हा प्रकार समजताच लंडन मधील आपद्कालिन यंत्रणा सज्ज झाल्या आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल केले. जखमींपैकी एकाजणाची प्रकृती गंभीर आहे असे मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितले.
हा दहशतवादीच प्रकार होता असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हल्लेखोराची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे त्याविषयी पोलिसांनी काही निश्चीत माहितीही समजली आहे पण त्यांनी ती अजून जाहीर केलेली नाही. आपण घेरलो गेलो आहोत हे लक्षात येताच हा हल्लेखोर एका दुकानासमोर पडून राहिला. त्याही वेळी त्याने एका महिलेला जखमी केले. पण पोलिसांनी नंतर मात्र त्याच्यावर गोळ्या चालवून त्याचा खेळ संपवला. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी इमर्जन्सी सर्व्हीसने आपली कामगीरी चोख बजावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांनीही पोलिसांचे अभिनंदन केले आहे.