नियम व अटी लागू… (भाग-१)

डॉ. तुषार निकाळजे
माझ्या मुलीचा मोबाइल बिघडला होता. दोन तीन वेळा दुकानात दुरुस्तीला देऊनही दुरुस्त झाला नाही. नवीन मोबाइल घेण्याची वेळ आली. तिला पहिजे असलेल्या मोबाइलची किंमत होती रु. 9000/- एवढी मोठी रक्‍कम गुंतविणे शक्‍य नव्हते. घरी आमची चर्चा चालू असताना पत्नी म्हणाली “”अहो आपण दहा महिन्यांपूर्वी टी.व्ही. हप्त्याने खरेदी केला होता ना, त्याच्यासोबत गिफ्ट कूपन मिळाले आहे. 
त्या गिफ्ट कूपनवर समान सहा हप्त्यांमध्ये मोबाइल मिळण्याची सवलत होती. आम्ही ते कूपन लगेचच शोधून काढले. दुपारी आम्ही कूपन घेऊन मोबाइलच्या दुकानात गेलो. कूपन दाखवले आणि सकाळी दाखविलेला मोबाइल कूपनवर हप्त्याने मागितला. ”सेल्समनने आम्ही सांगितलेले मॉडेल काढले, आमच्याकडील कूपन घेतले, एका कोऱ्या कागदावर हिशेब केला.
मोबाइलची किंमत रु. 9000/-, प्रोसेसिंग फी रु. 500/- असे एकूण रु. 9,500/- सहा हप्त्यांमध्ये फॉर्म भरून चेकद्वारे देण्यास सेल्समनने सांगितले. कॅश देत असाल तर रु. 9000/- मध्ये दहा टक्‍के डिस्काऊंट व प्रोसेसिंग फी रु. 500/- माफ. म्हणजे मोबाइल 8,100 रुपयांना पडेल. 1400 रुपयांचा फायदा. “”अहो असं कसं? कॅश घेतले तर वेगळे व हप्त्याने घेतले तर असे. हे कूपन तुमच्याच कंपनीचे आहे.” मी त्याच्याशी वाद घालू लागलो.
सेल्समनने त्या कूपनवरची *** नियम व अटी लागू हीे एकदम छोट्या अक्षरातील ओळ दाखवली. मी व पत्नी सुशिक्षित असल्याने *** नियम व अटी लागूचे तारे आमच्या डोक्‍यात चमकले. का म्हणजे बनवाबनवीचा किंवा लुटाकुटीचा प्रकार म्हणायला पाहिजे, पण म्हणून्ही काही उपयोग नाही हे आम्हाला कळत होते. मी मुलीच्या चेहऱ्याकडे पाहिले, तिचा चेहरा कोमेजला होता. मग फार विचार न करता मी समोर आलेला फॉर्म गुपचूप भरला व हप्त्यावरचा मोबाइल घेऊन घरी आलो.
नंतर त्याच दिवशी संध्याकाळी मॉलमध्ये कपडे घेण्यासाठी गेलो होतो. त्या मॉलमधील दोन मजले पहिल्यांदा नुसते फिरून पाहिले. गर्दी भरपूर होती. जणू जत्रा भरली होती. दोन-तीन ठिकाणी कपड्यांचे सेल होते. काही ठिकाणी 30% डिस्काऊंट, काही ठिकाणी 50% डिस्काऊंट, तर काही ठिकाणी एका खरेदीवर एक मोफत, अशा जाहिराती होत्या. त्यापैकी एके ठिकाणी मुलास व मुलीस कपडे खरेदी केली. कॅश काऊंटरवर बिल देण्यासाठी गेलो. आम्ही घेतलेल्या कपड्यातील काही कपडे बाजूला ठेवून सेल्समन म्हणाला, “”साहेब, या स्कीममध्ये या टाईपचे कपडे डिस्काऊंटने मिळत नाहीत.” मी म्हणालो “”अहो तुम्ही तर बाहेर एवढा मोठ्ठा बोर्ड लावला आहे की 50% डिस्काऊंट” सेल्समन म्हणाला “”साहेब, पुन्हा एकदा बोर्ड पाहून या, त्यावर खाली छोट्या अक्षरात *** नियम व अटी लागू लिहिले आहे.
 त्यावेळीही माझ्या डोक्‍यात तारे चमकले. आम्ही घेतलेले कपडे बदलून दुसरे कपडे निवडले व पैसे देऊन चौघे घरी आलो. त्या दिवशी सुट्टी असल्याने पत्नीने संध्याकाळचा स्वयंपाकही दुपारीच केला होता. तो स्वयंपाक फक्‍त गॅसवर गरम करून आम्ही जेवण्यास बसलो. मुलीस नवा मोबाइल घेतल्याने ती खूष दिसत होती. जेवता जेवता मी म्हणालो “”आज डोकं दुखू लागलंय या नियम व अटी लागू, कंडीशन ऍप्लाय नं”. आमचं जेवण चालू होतं, टी.व्ही. देखील चालू होता, गप्पाही चालू होत्या.
मुलाकडे बघून मी म्हणालो, “”काय रे, तुम्हा दोघा बहीण-भावांना अभ्यास करायला सांगितला, की तुम्ही थोड्या वेळाने मला किंवा तुझ्या आईला पिझ्झा, आईस्क्रीम, बर्गर, वडापाव आणण्यासाठी सांगता. म्हणजे आम्ही तुम्हाला अभ्यास करायला लावल्यास, आम्ही तुम्हाला पिझ्झा, आईस्क्रीम, बर्गर आणावा ही कंडिशन ऍप्लाय म्हणजे नियम व अटी लागू लागू होतात काय? म्हणजे आज बाहेर दुकानात घडलं तेच घराताही चालू असंत काय? हे आजच आम्हाला समजत आहे.” माझे बोलणे ऐकून मुलगा, मुलगी अणि पत्नी तिघेही हसले. मुलगा त्याच्या आईला म्हणाला “”आई, माझे बाबा अतिशय हुशार आहेत. त्यांनी ताईच्या मोबाइलचा, मॉलमधील कपड्यांच्या नियम व अटींचा अर्थ आमच्या अभ्यास आणि पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीमशी लावला.”
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)