शालेय शिक्षण विभागाचा निर्णय
पुणे – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयातील 5 हजार 279 अस्थायी पदांना 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
अस्थायी पदांना दि. 1 ऑक्टोबर 2019 ते दि. 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत आता संपली असल्यामुळे शिक्षण आयुक्त कार्यालयाने प्रशासकीय विभागास प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यांचा वापर करुन अस्थायी पदांना मुदवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शिक्षण आयुक्तांनी त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयात अस्तित्वात असलेल्या अस्थायी पदांना 31 मार्चपासून मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सर्व कार्यालयांनी व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांनी अस्थायी पदांची देयके सादर करताना त्यांच्या कार्यालयातील असणाऱ्या पदांचे कार्यालय आणि पदनिहाय विवरणपत्रे जोडण्याची दक्षता घ्यावी. या अस्थायी पदांवर पूर्वी ज्या लेखाशीर्षाखाली खर्च करण्यात येत होता. त्याच लेखाशीर्षाखाली खर्च करण्यात यावा व तो मंजूर तरतुदीतून भागवावा, असे शालेय शिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी संतोष ममदापुरे यांनी जारी केले आहेत.
शिक्षण आयुक्तांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयासाठी एकूण 7 हजार 131 पदे मंजूर आहेत. यात 1 हजार 852 पदे स्थायी आहेत व इतर पदे अस्थायी पदे आहेत. शिक्षण आयुक्त कार्यालयात एकूण 640 पदांमध्ये 234 पदे स्थायी तर 406 पदे अस्थायी आहेत. सर्व विभागीय कार्यालयांसाठी 6 हजार 284 पदे आहेत. त्यात 1 हजार 537 स्थायी तर 4 हजार 747 अस्थायी पदे आहेत.