सध्या करोना आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटांबरोबरच मालिकांचंही चित्रीकरण थांबलेले आहे. त्यामुळे सर्वच कलाकार सध्या घरांमध्ये बंदिस्त आहेत आणि आपापल्या परीने वेळ घालवत आहेत.
सर्वसामान्यांना ते काय करत आहेत याविषयी उत्सुकता असल्यामुळे कलाकार मंडळी सोशल मीडियावर याबाबतचे आपले व्हिडिओज शेअर करत आहेत.
तसेच माध्यमांमधूनही त्यांचे इन-आऊटस् समोर येत आहेत. सोनी वाहिनीवरील “इंडियाज बेस्ट डान्सर’मध्ये परीक्षक बनलेला आणि नामांकित कोरिओग्राफर असलेला टेरेन्स लुइस यानेही आपला लॉकडाऊनमधील अनुभव शेअर केला आहे.
तो म्हणतो, मी सध्या घराच्या टेरेसवर खिचडी बनवतो आहे. कारण सध्या बाहेरुन पदार्थ मागवणे पूर्णतः बंद आहे. त्यामुळे मी या खिचडीमध्ये रमलो आहे. नुकतीच मी बनवलेली खिचडी आमच्या सोसायटीच्या वॉचमनलाही दिली. कारण तो ऑन ड्युटी आहे. त्यातच सध्या बाहेर सर्व हॉटेल्स, खानावळी बंद असल्यामुळे त्यांना इतरत्र जाऊन खाण्याची सोय नाही.
त्यामुळे मी खिचडी घेऊन गेल्यानंतर तो आनंदी झाला. पण मीच त्याला धन्यवाद दिले. कारण सध्या आम्ही सर्व जण सोसायटीमध्ये लॉकडाऊन असताना ते मात्र सोसायटीची सुरक्षा करत आहेत.
माझ्या मते, प्रत्येकानेच आपल्या सोसायटीच्या वॉचमनना धन्यवाद देऊन, त्यांची विचारपूस करुन, प्रसंगी खायला काही तरी देऊन त्यांचे मनोबल उंचावले पाहिजे, असे लुईस म्हणतो.