यंदा 50 हजाराने विद्यार्थी संख्या घटली

दहावी परीक्षा आजपासून


प्रथमच नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा


 जुन्या अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शेवटची संधी


यंदा 8830 दिव्यांग विद्यार्थी देणार परीक्षा

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावीच्या लेखी परीक्षेला शुक्रवार (दि.1)पासून सुरू होत आहे. या परीक्षेला यंदा एकूण 17 लाख 813 विद्यार्थी बसणार आहेत.

धक्‍कादायक बाब म्हणजे यंदा गतवर्षीच्या तुलनेत दहावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 50 हजार 540 इतकी घटल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. विद्यार्थी संख्या घटल्याने शिक्षण क्षेत्रातून चिंता व्यक्‍त होत आहे.

दहावीची लेखी परीक्षा 1 ते 22 मार्च रोजी होत आहे. यावर्षी पहिल्यांदाच दहावी परीक्षा नवीन अभ्यासक्रमानुसार होत आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी 16 लाख 41 हजार 568 विद्यार्थ्यांनी आणि जुन्या अभ्यासक्रमानुसार राज्यात 59 हजार 245 असे दोन्ही मिळून एकूण 17 लाख 813 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात 9 लाख 27 हजार 822 विद्यार्थी, तर 7 लाख 72 हजार 842 विद्यार्थिनी आहेत. एकूण 22 हजार 244 माध्यमिक शाळांमधून विद्यार्थी दहावी परीक्षेला बसणार असून, राज्यात विद्यार्थ्यांसाठी 4 हजार 874 परीक्षा केंद्रे आहेत, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. शंकुतला काळे आणि सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

गतवर्षी दहावी परीक्षार्थींची संख्या 17 लाख 51 हजार 353 एवढी होती. यंदाची संख्या 17 लाख 813 इतकी आहे. तब्बल 50 हजार 540 विद्यार्थी संख्या यंदा घटल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यासंदर्भात, दरवर्षी दहावी परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या कमी-जास्त होत असते. यंदा विद्यार्थी संख्येत थोडी घट झाली असे म्हणता येईल. मात्र, 50 हजारांनी विद्यार्थी संख्या घटल्याने त्यावरून लगेच निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे म्हणणे आहे.

“सीबीएसई’चा ट्रेंड वाढला
राज्यात सध्या “सीबीएसई’ बोर्डाची संलग्नता घेण्यासाठी शाळांचा कल वाढला आहे. मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा “सीबीएसई’ बोर्डला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ही विद्यार्थी संख्या घटली आहे. तसेच, प्रतिष्ठेच्या शाळांमध्ये दहावीचा निकाल 100 टक्‍के लावण्यासाठी नववी विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचाही परिणाम दहावीच्या विद्यार्थी संख्येवर झाल्याचे शिक्षणतज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.