भुलेश्वर – सह्याद्री पर्वत रांगेतून दिवे घाटापासून पूर्वेकडे निघालेल्या डोंगर रांगेत शेवटच्या टेकडीवर महाराष्ट्रात जागृत देवस्थान व पुणे जिल्ह्यात शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून भुलेश्वरची ओळख आहे. शुक्रवारी (दि.21) महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातून भुलेश्वर मंदिरात दर्शनासाठी येतात. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यानिमित्त भुलेश्वर मंदिराबाबत प्रासंगिक…
हिमालयात एकदा पत्नी पार्वतीसोबत सारीपाटाच्या डावामध्ये भगवान शिव शंकर पराजीत झाल्यानंतर याठिकाणी येऊन तपसाधना करीत होते. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर असणारी गंगा याठिकाणी पडल्यामुळे शिवलिंगाखाली सतत पाणी असते. मुख्य शिवलिंगाखाली ब्रम्हा, विष्णू, महेश अशी तीन स्वयंभू लिंगे आहेत. याठिकाणी तपसाधना करीत असताना पार्वती मातेने भगवान शिवशंकरांना भुलवण्यासाठी भिल्लीनीचे रुप घेऊन नाच केला. भगवान शिवशंकर भुलले. ते ओळखू शकले नाहीत. पार्वतीमातेस म्हणून याठिकीणास भुलेश्वर नाव पडले, अशी आख्यायिका आहे.
मंदिराची रचना हेमाडपंथी पद्धतीची असून मंदिराच्या बांधकामाविषयी कुठेही शिलालेख नाहीत. परंतु याठिकाणी असणाऱ्या सप्तमातृकांच्या मूर्तीवरून मंदिर 10व्या शतकापूर्वीचे असल्याचे वाटते. मंदिर बांधकामासाठी वापरलेला चार प्रकारचा दगड व न्हानी कुंड पाहिल्यावर मुख्य मंदिर, ओवरी, आवारभिंत, सभामंडप व शिखरे अशा चार टप्प्यात मंदिराचे बांधकाम झाले आहे. मंदिरासमोरील सभामंडप व त्यावरील नगारखाना व तीन शिखरांचे बांधकाम पुण्याचे पेशवे व सातारचे शाहु महाराज यांचे गुरु ब्रम्हेद्रस्वामी यांनी केल्याचे पुरावे सापडतात.
सभामंडप पार करून पुढे लाकडी दरवाजापुढे एका दगडी चौकटीत मारुतीची मूर्ती दिसते. ती कालांतराने नंतर बसवली असल्याचे दिसते. पुढे दगडी जीना चढून वर आल्यानंतर भव्य दगडी नंदी दिसतो. नंदिसमोर गाभाऱ्यात भुलेश्वर महादेव. भुलेश्वराचे दर्शन करून बाहेर आल्यावर प्रदक्षिणा मार्गावर सीता स्वयंवर, चौसष्ट योगिनी, सप्तमातृका, सीतेचे अपहरण, महाभारतातील युद्ध प्रसंग, शरपंजिरी भीष्माचार्य, द्रौपदी स्वयंवर, समुद्रमंथन अशी विविध शिल्प आहे.
भुलेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा आज जागर होणार
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील एका टेकडीवर वसलेले भुलेश्वर मंदिरात भुलेश्वर महादेवाची महाशिवरात्री यात्रा शुक्रवार (दि.21) होत आहे. यात्रेसाठी भुलेश्वर देवस्थान सज्ज झाले आहे. भाविकांना रांगेतून सुलभ दर्शन व्हावे, याकरिता दर्शनरांगेची सोय तसेच भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय माळशिरस ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आल्याचे उपसरपंच माऊली यादव यांनी सांगितले. पार्किंगची सोय मंदिराच्या पायथ्याला भुलेश्वर वन उद्यानाच्या कमानी बाहेर केली आहे. सरपंच महादेव बोरावके यांनी पाहणी केली.