चीनसोबतच्या तणावाचा परिणाम अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामावर

राम मंदिर बांधण्याची तारीख लांबणीवर

नवी दिल्ली : भारत चीन सीमेवर घडलेल्या घटनेचा परिणाम अयोध्येतल्या राम मंदिराच्याही कामावर होताना दिसत आहे. कारण सीमेवरच्या वाढत्या तणावामुळे राम मंदिराच्या उभारणीचे काम लांबणीवर टाकण्यात आले आहे. राम मंदिर ट्रस्टने अधिकृतपणे ही तारीख पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. सध्या भारत चीन सीमेवरची स्थिती ही चिंताजनक असून देशाचे रक्षण ही पहिली प्राथमिकता आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी मंदिर निर्मितीचे काम पुढे ढकलले जात असून स्थितीचा आढावा घेतल्यानंतर नवी तारीख जाहीर केली जाईल असे मंदिर ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मागच्या वर्षी ऐतिहासिक निर्णय देत वादग्रस्त जागेवर मंदिर निर्मितीस हिरवा कंदील दिला होता. मंदिर निर्मितीच्या कामासाठी राम मंदिर ट्रस्टवर न्यायालयाच्याच आदेशाने जबाबदारी सोपवली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून मंदिर निर्मितीचे हे काम नेमके कधी सुरु होणार याबाबत वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. मात्र मंदिर ट्र्स्टने या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे कालच जाहीर केले होते. आठवडाभरापूर्वीच अयोध्येत ज्या ठिकाणी मंदिर उभारले जात आहे, तिथे भव्य रुद्राभिषेकही आयोजित करण्यात आला होता.

जमिनीच्या समतलीकरणाचे कामही सुरु होते. मात्र आता भारत चीन सीमेवर वाढलेल्या तणावामुळे मंदिर निर्मितीचे काम पुढे ढकलायचे ट्रस्टने ठरवले आहे. अयोध्या शहरात काल काही हिंदुत्ववादी संघटनांनी चीनविरोधी निदर्शनेही केली होती. चिनी मालाची होळी, चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या पुतळ्याची होळी करण्याचे काम विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केले होते. त्यामुळे आता मंदिर निर्मितीच्या शुभारंभाची नवी तारीख काय असणार याची उत्सुकता आहे.

कोरोना संकटामुळे याआधीचे अनेक मुहूर्त लांबणीवर पडले होते. डिसेंबर महिन्यात झारखंड निवडणुकीचा प्रचार करताना गृहमंत्री अमित शाह यांनी लवकरच मंदिर निर्मितीचे काम सुरु होणार असून, अवघ्या 4 महिन्यांत गगनचुंबी मंदिर अयोध्येत बनेल अशी गर्जना केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.