तैपेई – चीनने तैवानच्या सामुद्रधुनीमध्ये सुरू केलेल्या सागरी युद्धसरावादरम्यान दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत. चार दिवसांचा हा युद्धसराव संपण्याच्या काही तास आगोदर दोन्ही देशांच्या युद्धनौका तैवानच्या सामुद्रधुनीमध्ये आमने सामने उभ्या ठाकल्या होत्या. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवानभेटीनंतर चीनने हा युद्धसराव सुरू केला होता.
आज सकाळी चीन आणि तैवान दोन्ही देशांच्या प्रत्येकी 10 युद्धनौका तैवानच्या सामुद्रधुनीमध्ये उतरल्या होत्या. युद्धसरावादरम्यान चीनच्या काही नौका सागरी हद्द ओलांडून आत घुसल्या होत्या. दोन्ही देशांची सागरी सीमा जेथे आहे, त्यापुढे या नौका आल्या होत्या. चीनच्या युद्धनौकांनी शनिवारी देखील अशाच प्रकारे तैवानच्या सागरी हद्दीमध्ये घुसखोरी केली होती. तेंव्हा तैवानच्या युद्धनौकांनी केवळ पहाणी करण्याचे काम केले होते.
आज देखील चीनच्या युद्धनौकांनी सागरी हद्द ओलांडण्यास सुरुवात केली, तेंव्हा तैवानच्या युद्धनौकांनी त्यांना रोखण्यासाठी इशारे दिले. मात्र आपल्या युद्धनौकांनी कोणतीही घुसखोरी केलेली नाही, असे चीनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
चीनच्या आक्रमक युद्धसरावाच्या पार्श्वभुमीवर तैवानने आंतरराष्ट्रीय समुदायाची मदत मागितली आहे. युद्धसरावाच्या नावाखाली तैवानवर हल्ला केला जाण्याची शक्यताही तैवानने व्यक्त केली आहे. चीनच्या लढाऊ विमानांनी आणि युद्धनौकांनी सागरी हद्दीचा भंग केला असल्याने ही भीती तैवानच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे.