मुंबईतील डॉक्‍टरांवरही तणावात; करोनाच्या परिस्थितीत सततच्या कामामुळे येतेय नैराश्‍य

 

 

मुंबई – देशासह राज्यात करोनाने कहर केला असून राज्यातील सर्वाधिक रुग्ण ही मुंबईत आहेत. मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने येथील वैद्यकीय सेवांवरील ताण वाढला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ही स्थिती कायम असल्याने डॉक्‍टरांवर दबाव वाढत असून त्यांचीही मानसिक स्थिती ढासळत असल्याचे धक्‍कादायक चित्र समोर येत आहे. मुंबईतील कोविड रुग्णालयांमधील कर्तव्यावर असलेल्या डॉक्‍टरांना नैराश्‍यासह गंभीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

याबाबत नाव न सांगण्याच्या अटीवर एका रहिवासी डॉक्‍टरने सांगितले की, सध्या करोनाच्या परिस्थितीत सरकारी आणि पालिका रुग्णालयांवरील कामाचा ताण अधिक वाढला आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांच्यावर उपचार करणे, तसेच घरोघरी जावून तपासणी करणे आदी काम करावे लागत आहे. करोनाचा संसर्ग वाढतच असल्याने अशा स्थितीत सातत्याने काम केल्याने अधिक दबाव येत आहे.

तसेच पीपीईमध्ये तुम्ही थकलेला असला तरी ब्रेक घेतल्याशिवाय थांबू शकत नाही. तसेच अचानक शौचालयाशही जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीतच रुग्णांवर लक्ष केंद्रित करावे लागते. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता आम्हाला जीव टाकून काम करावे लागत आहे.

कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी केल्यानंतर आपण सेफ झोनमध्ये आहोत, याची शाश्वती नाही. त्यातच स्वत:ची काळजी घेण्यासाठी किंवा कुटुंबातील सदस्यांना फारसा वेळ देता येत नाही. आज अनेक डॉक्‍टर आपल्या कुटुंबापासून दूर आहेत. या सर्वाचा आमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

केईएम रुग्णालयातील आणखी एक निवासी डॉक्‍टरनेही त्यांना सहमती दर्शवली. ते म्हणाले, होय, आम्ही दररोज तणावग्रस्त परिस्थितीत काम करत आहे. या संकटाला आम्ही सामोरे जात आहे. परंतु आम्ही हा उदात्त व्यवसाय निवडला आणि ही आमच्या मानसिक तयारीचीही चाचणी आहे.

या परिस्थितीतही आम्ही मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करतो. यासाठी नियमित व्यायाम आणि प्राणायाम, योग करतो. तसेच बहुतेक वेळा आपल्या समस्या मित्र आणि वरिष्ठ डॉक्‍टरांसमवेत सामायिक करतो, असे त्यांनी सांगितले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.