कराड शहरातील तणाव निवळला…

बहुजन क्रांतीची रॅली, भाजप-शिवप्रतिष्ठानचा मोर्चा

कराड  – नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) यांच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंद दरम्यान भाजप व शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कराड शहरातील बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलीस वेळेत पोहोचल्याने तणाव निवळला. दरम्यान, तणावामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली.

सीएए व एनआरसीविरोधात बहुजन क्रांती मोर्चाने बुधवारी भारत बंदची हाक दिली होती. कराडमध्ये काही ठिकाणी आठ दिवसांपासून “बंद’चे आवाहन करणारे फलक लावण्यात आले होते. याच मुद्द्यांवर वंचित बहुजन आघाडीने सोमवारी (दि. 20) केलेल्या महाराष्ट्र बंदला कराडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी व्यापारउदीम ठप्प झाला होता.

त्यानंतर लगेच आठ दिवसात बंदचे आवाहन करण्यात आल्याने कराडच्या व्यापाऱ्यांनी पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांची सोमवारी (दि. 27) भेट घेऊन बंदमध्ये सहभागी होणार नाही, पोलीस संरक्षण द्या, अशी मागणी केली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले होते. मात्र, बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी शहरातून रॅली काढत बंदचे आवाहन केल्याने आज होणार का, असा प्रश्‍न नागरिकांना पडला होता. बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी दुचाकी रॅली काढून बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप व शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दुपारी बारा वाजता बाजारपेठेत जाऊन व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले.

चावडी चौकातून हा मोर्चा दत्त चौकाजवळ आला. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव तेथे आले. ज्या व्यापाऱ्यांना दुकाने उघडायची आहेत, ते दुकाने उघडतील. तुम्ही व्यापाऱ्यांना आवाहन करू नका, असे गुरव यांनी पावसकर यांना सांगितले. त्यानंतर हा मोर्चा चावडी चौकाकडे परत निघाला असता मोमीन मोहोल्ला व मनोऱ्याजवळ मुस्लिम बांधव गोळा झाले. त्यामुळे मोमीन मोहल्ला, मंडई व चावडी चौक या भागात काही वेळ तणाव निर्माण झाला. त्यावेळी पोलिसांनी रस्त्यावर थांबलेल्या हुल्लडबाज युवकांना हटकले. दरम्यान, सूरज गुरव यांनी युवकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. पोलिसांनी चावडी चौकात बंदोबस्त नेमला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.