नवी दिल्ली : देशात करोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने आता टेन्शन वाढत असल्याचे दिसत आहे. मागील 24 तासांत 4041 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच गुरुवारी दिवसभरात 10 रुग्णांचा मृत्यू आहे. ही मार्च महिन्यानंतर देशात झालेली सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. देशात 11 मार्चनंतर ही सर्वात जास्त करोना रुग्णांची नोंद झाली आहे. करोनाबाधितांची संख्या तीन हजारांवरून चार हजारांवर पोहोचली आहे.
देशात करोनाच्या संसर्गात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 177 एवढी झाली आहे. सक्रिय रुग्णांची दर 0.05 टक्के आहे. तर देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्के आहे. गुरुवारी दिवसभरात 2 हजार 363 रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत 10 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 4 लाख 25 हजाप 379 नमुने तपासण्यात आले आहेत.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/eVGpM8td6y pic.twitter.com/ykoU5DV6Y4
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) June 3, 2022
देशव्यापी करोना लसीकरणात आतापर्यंत 193 कोटीहून अधिक करोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. भारतात करोनामुळे आतापर्यंत 5 लाख 24 हजार 651 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात करोनाच्या संसर्गातून 4 कोटी 26 लाख 22 हजार 757 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक नवे रुग्ण आढळले आहे.
गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 1045, दिल्लीमध्ये 373, तामिळनाडू 145, तेलंगणात 67, गुजरातमध्ये 50 तर मध्य प्रदेशमध्ये 25 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. कर्नाटकच्या आरोग्य मंत्री के. सुधाकर यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी गुरुवारी ट्विट करत ही माहिती दिली आहे.