बीड – खंडणी प्रकरणातील आरोपी आणि धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडच्या रिमांडवर आता केज न्यायालयाऐवजी बीड जिल्हा न्यायालयातील विशेष मकोका कोर्टात सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान तपास अधिकाऱ्यांकडून नवनवीन दावे आणि माहिती कोर्टासमोर सादर करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने वाल्मीक कराडला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एसआयटीने 10 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती.
वाल्मीक कराडला विशेष मकोका न्यायालयाने 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली आहे. मकोका कायद्यांतर्गत ही कोठडी देण्यात आली आहे. या 7 दिवसांत वाल्मीक कराड याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग होता का? यासह विविध बाबींची चौकशी एसआयटी करणार आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची मागणी एसआयटी पथकाने केली होती. त्यानुसार आरोपी कराडला आज सत्र न्यायालयात पोलीस व्हॅनमध्ये नेत असताना परिसरात आजही निदर्शने करण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. यावेळी वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ अनेकांनी घोषणाबाजी केली, तर काहींनी वाल्मिक कराडला विरोधाही घोषणाबाजी केली.
बीड सत्र न्यायालयातील सुनावणीनंतर एसआयटी पथकाने वाल्मिक कराडला न्यायालयातून बाहेर आणल्यानंतर कोर्टाबाहेर राडा झाल्याचे पाहायला मिळाले. कोर्टाबाहेर वकिलांचेच दोन गट दिसून आले, त्यापैकी एका महिला वकिलाने वाल्मिक कराडवर आरोप करत फाशीची शिक्षा द्या म्हणत घोषणाबाजी केली. तर, एका वकिलाने वाल्मिक कराड यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याचे म्हणत त्यांचे समर्थन केले. तसेच आंदोलनाच्या माध्यमातून दबाव टाकला जात असल्याचे म्हटले. त्यानंतर पोलीस व इतर सुरक्षा रक्षकांनी संबंधित आंदोलकांना ताब्यात घेतले.
काही वकिलांनीही संविधानाचा दाखला देत वाल्मिक कराडवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आल्याचे मत मांडले. यामुळे बीडच्या कोर्टाबाहेर काही काळ परिस्थिती तणावग्रस्त असल्याची पाहायला मिळाला.