टेनिस : पीसीएलटीए क्‍ले किंग्सला प्लेट डिव्हिजन गटाचे विजेतेपद

आठवी शशी वैद्य मेमोरियल टेनिस स्पर्धा

पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) तर्फे आयोजित आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्‍लब अजिंक्‍यपद टेनिस स्पर्धेत प्लेट डिव्हिजन गटात पीसीएलटीए क्‍ले किंग्स संघाने एसपी कॉलेज 1 संघाचा 22-12 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेतील अंतिम फेरीच्या सामन्यात पीसीएलटीए क्‍ले किंग्स संघाने एसपी कॉलेज 1 संघाचा 22-12 असा पराभव केला. 100 अधिक गटात पीसीएलटीएच्या विजय खन्ना व नंदू रोकडे या जोडीने एसपी कॉलेज संघाच्या आशिष डिके व मंदार मेहेंदळे यांचा 6-1, तर खुल्या गटात डॉ. राजेश मित्तल व अनंत गुप्ता यांनी एसपी कॉलेजच्या केदार पाटील व आदित्य जोशी यांचा 6-2 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर 90 अधिक गटात पीसीएलटीएच्या रवी जौकनीने निर्मल वाधवानीच्या साथीत एसपी कॉलेजच्या उमेश भिडे व गजानन कुलकर्णी या जोडीचा 6-3 असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. खुल्या गटात पीसीएलटीएच्या प्रवीण घोडे व धर्मेश वाधवानी यांना एसपी कॉलेजच्या संतोष शहा व स्वेतल शहा या जोडीचा 4-6 असा पराभव केला. पण सामन्यात पीसीएलटीए क्‍ले किंग्स संघाने आपले वर्चस्व कायम राखत एसपी कॉलेज 1 संघावर 22-12 अशा फरकाने विजय मिळवला.

स्पर्धेतील विजेत्या पीसीएलटीए क्‍ले किंग्स संघाला करंडक व 10 हजार रुपये, तर उपविजेत्या एसपी कॉलेज 1 संघाला करंडक व 5 हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. याशिवाय विजय खन्ना यांना उत्कृष्ट प्रौढ खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे आणि एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्‍लबच्या टेनिस विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे, क्‍लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, गिरीश करंबेळकर, सारंग लागू, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.