तिसरी पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप टेनिस सिरिज
पुणे – पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील तिस-या पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात श्रावणी देशमुख हिने अव्वल मानांकित खेळाडू सिद्धी खोतचा 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उप-उपांत्यपूर्व फेरीत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात बिगरमानांकीत सोहम अमुंडकर याने सातव्या मानांकित अद्विक नाटेकरचा 6-0 असा सहज पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. बाराव्या मानांकित अर्जुन किर्तनेने आठव्या मानांकित अर्णव बनसोडेचे आव्हान 6-5(7-4) असे संपुष्टात आणले.
अर्जुन कीर्तनेचा सामना दुसऱ्या मानांकित अनिश रांजलकर याच्याशी असणार आहे. तर, मुलींच्या गटात सहाव्या मानांकित देवांशी प्रभुदेसाई हिने तिसऱ्या मानांकित सिमरन छेत्रीचा टायब्रेकमध्ये 6-5(7-5) असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. 12वर्षाखालील मुलांच्या गटात नवव्या मानांकित अवनीश चाफळे याने पाचव्या मानांकित अर्जुन कीर्तनेचा 6-3 असा पराभव केला. काल अव्वल मानांकित खेळाडू जश शहाविरुद्ध धडाकेबाज विजय मिळविणाऱ्या तेज ओकने नीव कोठारीला 6-1 असे पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.