मेलबर्न – क्रिकेटपटूंना समर्थन देत ऑस्ट्रेलियाच्या टेनिसपटूंनीही आता देशातील करोना नियमांना उघडपणे विरोध करण्यास सुरुवात केली आहे. करोनाची देशातील स्थिती सुधारलेली असतानाही या नियमांचे पालन कशासाठी बंधनकारक केले जात आहे, असा सवालही आता टेनिसपटू करत आहेत.
करोनाचा धोका कमी झालेला असल्यामुळे जगातील जवळपास सर्वच देशांनी नियमात सवलती देण्यास सुरुवात केली आहे. आता प्रवाशांना इतर देशात प्रवास करणेही सोपे होत आहे. ऑस्ट्रेलियाने मात्र या निर्बंधात कोणतीही सवलत दिली नसून, याचा परिणाम खेळाडूंवर होत आहे.
ऑस्ट्रेलिया सरकारच्या या धोरणामुळे आता क्रिकेट पाठोपाठ टेनिस खेळाडूंमध्ये देखील नाराजी पसरली आहे. ऑस्ट्रेलियात येण्यासाठी परदेशी लोकांना करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे अनिवार्य आहे. तसेच, देशातील विविध राज्यांत प्रवेश केल्यानंतर येथील विलगीकरणाच्या नियमांचेही काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.
जोकोवीचकडूनही इशारा
टेनिसमधील चार ग्रॅंडस्लॅमपैकी असलेली पहिली ग्रॅंडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन देखील या निर्णयामुळे संकटात येणार आहे. करोनाबाबतचे हे नियम पुढील वर्षी जानेवारीपर्यंत कायम राहणार असल्याचे सुतोवाच ऑस्ट्रेलिया सरकारने केले असल्याने देशातील क्रीडापटूंनीही आता संताप व्यक्त केला आहे.
सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविच यानेही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात यायचे की नाही ते ठरवावे लागेल, असा इशाराही काही दिवसांपूर्वी दिला होता.